Join us

तरुणांच्या नवसंकल्पनांना चालनेसाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जून २०२१पर्यंत आहे.

स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे, हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत विजेत्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन तथा सेवेची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येतात. यामध्ये कृषी, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वतता - प्रदूषणमुक्त ऊर्जा, शाश्वतता - कचरा व्यवस्थापन, शाश्वतता - जलव्यवस्थापन, गतिशीलता, प्रशासन, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी स्टार्टअप्स अर्ज करू शकतात, असे मलिक यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आतापर्यंत तीनवेळा यशस्वीपणे संपन्न झाला आहे. यावर्षीदेखील स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वीच्या सप्ताहातील विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम पूर्ण केले आहे.