३ ते ५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:37+5:302021-09-03T04:05:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कौशल्य स्पर्धांना युवा वर्गाने चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हा आणि विभागीय स्पर्धांमध्ये सुमारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कौशल्य स्पर्धांना युवा वर्गाने चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हा आणि विभागीय स्पर्धांमध्ये सुमारे वीस हजार जणांनी सहभाग घेतला होता. यापैकी २६३ उमेदवार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा पार पडणार आहे. यातील शंभर विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार असल्याची माहिती, राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मंत्रालयात माध्यमांशी बोलताना मंत्री मलिक म्हणाले की, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, लँडस्केप गार्डनिंग, इंडस्ट्रियल कंट्रोल, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, आयटी, ॲग्रीकल्चर, फ्लोरिस्ट्री यासारख्या कौशल्य व्यवसायांमध्ये या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत तब्बल वीस हजार उमेदवारांनी सहभाग घेतला होता. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील दोन फेऱ्यांनंतर एकूण २६३ उमेदवार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडेल. राज्यातील विविध भागात ४५ श्रेणींमध्ये ही स्पर्धा होणार आहे. राज्यस्तरीय चॅम्पियन्सना रोख बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेमुळे युवक-युवतींमधील नवसंकल्पना आणि त्यांच्यातील उद्यमशीलता यांना चालना मिळेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधील विविध कौशल्य प्रशिक्षण अकादमी तथा केंद्रांवरील राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा पार पडणार आहे. यातील शंभर विजेत्यांना विभागीय आणि राष्ट्रीय स्किल्स स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना वर्ल्ड स्किल्ससह विविध आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. ऑलिम्पिकच्या बरोबरीने कौशल्यामध्ये वर्ल्ड स्किल्स ही व्यावसायिक कौशल्यांची जागतिक स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तिचे आयोजित केले जाते. पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चीनच्या शांघाय येथे ही स्पर्धा भरणार आहे. यात ६० हून अधिक देश सहभागी होण्याची शक्यता आहे.