Join us  

‘रज:काल स्वास्थ्य सप्ताहा’चे आयोजन

By admin | Published: May 09, 2017 1:38 AM

रज:काल स्वास्थ्य नियोजन जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून २८ मे हा रज:काल स्वास्थ्य दिन (मासिक पाळीसंबंधीची स्वच्छता) साजरा केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रज:काल स्वास्थ्य नियोजन जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून २८ मे हा रज:काल स्वास्थ्य दिन (मासिक पाळीसंबंधीची स्वच्छता) साजरा केला जातो. या विषयावर शहरापासून ग्रामीण भागापर्यंत जनजागृती व्हावी, याकरिता शासनाच्या माध्यमातून २८ मे ते ३ जून २०१७ दरम्यान ‘रज:काल स्वास्थ्य सप्ताह’ म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.रज:काल दिनाच्या नियोजनाबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिकलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, आयुष संचालक कुलदीपराज कोहली, होमीओपॅथी परिषदेचे अध्यक्ष अजित फुंदे, आरोग्य भारतीचे डॉ. दीपक घुमे, होमीओपॅथीलिस्ट दिलीप भुयार आदी या वेळी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले की, रज:काल सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी व त्यावर उपाययोजना सुचविण्याकरिता समिती गठित करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयांतून पोस्टर घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, तसेच ग्रामीण मागास भागावर विशेष भर द्यावा, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या. रज:काल हा सामान्यत: स्त्रियांमध्ये वय वर्ष १४ ते ५0 या कालावधीमध्ये असणारी स्वास्थ्याच्या दृष्टीने हितकर नैसर्गिक अनिवार्य प्रवृत्ती आहे.