Join us

बिबट्याकडून नागरिकावर होणाऱ्या हल्यांबाबत चर्चासत्राचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 5:28 PM

लोकमतने गेले काही महिने सातत्याने लोकमत ऑन लाईन आणि लोकमत मधून वृत्त प्रसिद्ध केले होते.

मुंबई-आरे परिसर तसेच त्याला लागून असलेले गोकुळधाम व साईबाबा नगर या संकुलामध्ये बिबट्याचा गेल्या काही दिवसातील वावर नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण करणारा ठरला आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये आरे कॉलनीतील युनिट नं. ३१ मधील श लक्ष्मी उंबरसाडे व अन्य एका व्यक्तीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. साईबाबा संकुल परिसरात सुद्धा रात्रीच्यावेळी बिबट्या फिरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर झाल्यानंतर या संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड  भीती निर्माण झाली आहे.

या सर्वाची गंभीर दखल घेऊन प्रभाग ५२ च्या नगरसेविका  प्रिती सातम यांनी तातडीने आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या विषयावर नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी व त्यावरील उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा व माहिती सत्राचे आयोजन काल सायंकाळी वाजता लँडमार्क हॉल, साईबाबा कॉम्प्लेक्स येथे केले होते.लोकमतने गेले काही महिने सातत्याने लोकमत ऑन लाईन आणि लोकमत मधून वृत्त प्रसिद्ध केले होते.

बिबट्याचा वावर तसेच त्याच्या हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण या बाबत  माहिती व जंगली प्राण्या संदर्भात नागरिकांनी काय करावे व काय करू नये या विषयाची माहिती देऊन  लोकांच्या मनातील शंका  व भीती कमी करण्याचा प्रयत्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आला. यावेळी सदर बिबट्याला पकडून दूर जंगलात नेण्याची लोकांनी मागणी केली त्यावरही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

सदरच्या चर्चासत्रासाठी वनपाल नारायण माने, वनरक्षक  सुरेंद्र पाटील तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी  शैलेश सोन सिंग,संरक्षण करणारे अधिकारी  वैभव पाटील, दिनेश गुप्ता तसेच  स्थानिक रहिवासी , विविध सोसायट्यांचे सुरक्षारक्षक व आरे वसाहतींमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अशा पद्धतीचे चर्चासत्र हे लोकप्रतिनिधींनीच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत असल्याची कबूली देताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीने अधिकाऱ्यांनी नगरसेविका  प्रिती सातम यांना धन्यवाद दिले.तसेच अशा पद्धतीची चर्चासत्र या परिसरात इतर ठिकाणी सुद्धा आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी त्यांना विनंती  केली.

टॅग्स :मुंबईबिबट्या