मालाडमध्ये मृत्यूचे तांडव; बांधकाम कोसळून ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:05 AM2021-06-11T04:05:53+5:302021-06-11T04:05:53+5:30

७ जखमी; मृतांमध्ये ८ लहान मुलांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी गेट नंबर ८ येथील ...

Orgy of death in Malad; 11 killed in building collapse | मालाडमध्ये मृत्यूचे तांडव; बांधकाम कोसळून ११ जणांचा मृत्यू

मालाडमध्ये मृत्यूचे तांडव; बांधकाम कोसळून ११ जणांचा मृत्यू

Next

७ जखमी; मृतांमध्ये ८ लहान मुलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी गेट नंबर ८ येथील चार मजली रहिवासी बांधकामाचा तिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्यावरील भाग तळमजल्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले. बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये ५ पुरुष, ६ महिलांचा समावेश असून, यातील ८ लहान मुले आहेत.

साहिल सरफराझ सय्यद (९/पु), आरिफ शेख (९/स्त्री), शफिक सालेम सिद्दीकी (४५/स्त्री), तौसिफ शफिक सिद्दीक (१५/पु), अलिशा शफिक सिद्दीकी (१०/स्त्री), अल्फिसा शफिक सिद्दीकी (१.५/स्त्री), अल्फिना शफिक सिद्दीकी (६/स्त्री), इशरत बानो शफिक सिद्दीकी (४०/स्त्री), रहिसा बानो सफिक सिद्दीकी (४०/स्त्री), ताहेस सफिक सिद्दीकी (१२/पु) आणि जोहन इरन्ना (१३/पु) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत.

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दुर्घटनेतील सात जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी धनलक्ष्मी बेबी, सलीम शेख, रिझवान सय्यद, सूर्यमनी यादव, करिम खान, गुलझार अहमद अन्सारी यांची प्रकृती स्थिर आहे, तर मरिकुमारी हिरागन्ना यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी गुरुवारी दुपारी शताब्दी रुग्णालयातील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दुर्घटनाग्रस्त बांधकाम हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर वसलेले असून, या दुर्घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

* मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

..........................................

Web Title: Orgy of death in Malad; 11 killed in building collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.