Join us

मालाडमध्ये मृत्यूचे तांडव; बांधकाम कोसळून ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:06 AM

सात जखमी; मृतांमध्ये आठ लहान मुलांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी गेट नंबर ८ येथील ...

सात जखमी; मृतांमध्ये आठ लहान मुलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी गेट नंबर ८ येथील चार मजली रहिवासी बांधकामाचा तिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्यावरील भाग तळमजल्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला; तर सातजण जखमी झाले. बुधवारी (दि. ९) रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पाच पुरुष, सहा महिलांचा समावेश असून, यातील आठ लहान मुले आहेत.

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दुर्घटनेतील सात जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी धनलक्ष्मी बेबी, सलीम शेख, रिझवान सय्यद, सूर्यमनी यादव, करिम खान, गुलझार अहमद, अन्सारी यांची प्रकृती स्थिर आहे; तर मरिकुमारी हिरागन्ना यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी गुरुवारी दुपारी शताब्दी रुग्णालयातील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दुर्घटनाग्रस्त बांधकाम हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर होते.

ठेकेदाराला अटक

मालाड मालवणी बांधकाम दुर्घटनेप्रकरणी घरमालक शफिक सिद्दीकी आणि ठेकेदार रमजान अली शेख यांच्याविरुद्ध कलम ३०४ (२), ३०४ (अ) ३३६, ३३७, ३३८, ३४, भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे.

मृतांची नावे

साहिल सरफराझ सय्यद (९/पु), आरिफ शेख (९/स्त्री), शफिक सालेम सिद्दीकी (४५/स्त्री), तौसिफ शफिक सिद्दीक (१५/पु), अलिशा शफिक सिद्दीकी (१०/स्त्री), अल्फिसा शफिक सिद्दीकी (१.५/स्त्री), अल्फिना शफिक सिद्दीकी (६/स्त्री), इशरत बानो शफिक सिद्दीकी (४०/स्त्री), रहिसा बानो सफिक सिद्दीकी (४०/स्त्री), ताहेस सफिक सिद्दीकी (१२/पु) आणि जोहन इरन्ना (१३/पु)

मृतांच्या वारसांना प्रत्येकी ७ लाखांची मदत

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करीत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

...तर दुर्घटना टळली असती

मालाड मालवणीतील चारमजली रहिवासी बांधकाम पाच ते सहा वर्षांपूर्वीच बांधले होते. त्याला तडे गेल्यानंतर बांधकामाचा काही भाग कलंडला होता. वेळीच रहिवाशांना घर खाली करायला लावून दुरुस्तीचे काम करून घेणे गरजेचे असताना घरमालकाने त्यातील भेगांमध्ये सिमेंट भरून वरवरची डागडुजी केली. वेळीच लक्ष दिले असते, तर दुर्घटना टळली असती, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.

तौक्ते वादळातच गेले होते बांधकामाला तडे

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले की, तौक्ते वादळातच बांधकामाला तडे गेले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्यात स्ट्रक्चरल बदल केल्यामुळे बांधकाम कोसळले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तसेच संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात येत आहे.