मुंबई : सारीपुतनगर अंधेरी पूर्व मरोळ औद्योगिक क्षेत्रामधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सुमारे ४४० घुसखोरांनी विकासकाशी संगनमत करुन बेकायदा घरांचा ताबा घेतला आहे. या योजनेतील एकूण प्लॉटचा एरिया हा १८,८६४.५० चौरस मीटर इतका होता. एमआयडीसीला द्यावयाचा प्लॉटचा एरिया ३,७६० चौरस मीटर इतका होता. या योजनेतील पॉकेट ९ इमारतींमध्ये सदनिका वाटप करताना आर्थिक व्यवहार करुन विकासकाने अनेक झोपडीधारकांच्या सदनिका परस्पर विकून या प्रकल्पात अनियमितता आणली. गेली अनेक वर्षे येथील मूळ झोपडीधारक हक्काच्या घरापासून वंचित आहेत. अनेक झोपडीधारकांना तर विकासकाने मागील चार ते पाच वर्षांपासून भाडेही दिलेले नाही. तर ज्या इमारती पूर्ण झाल्या आहेत, त्या इमारतींमध्ये मूलभूत सुविधाही दिलेल्या नाहीत, अशा तक्रारी रहिवाशांकडून करण्यात येत होत्या.
या सर्व घुसखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन मूळ घर मालकांना घरांचा ताबा देण्यात यावा, अशा सूचना आमदार रवींद्र वायकर यांनी एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. तसेच या योजनेतील ज्यांना अद्याप सदनिका मिळालेल्या नाहीत, अशा सुमारे ११६ सदनिकाधारकांची नव्याने बनविण्यात आलेल्या घरांसाठीची प्रथम जाहीर लॉटरी काढण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर यांनी दिले.
२३९ घरांची पाहणी पूर्ण झाली आहे. उर्वरित २०१ घरांच्या पाहणीचे काम बाकी असून तेही काम या महिन्याभरात पूर्ण करण्यात येईल. ज्या २३९ घरांच्या पाहणीचे काम पूर्ण झाले त्यातील घुसखोरांना तत्काळ बाहेर काढून मूळ पात्र झोपडीधारकांना हे घर देण्यात यावे. घुसखोरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशा सूचना वायकर यांनी दिल्या. या बैठकीला भाई मिर्लेकर, कैलासनाथ पाठक, मंदार मोरे उपस्थित होते.