मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या घुसमटीचे मुख्य कारण हे येथील गर्दीचे अयोग्य नियोजन असल्याचेच निदर्शनास येते. उपनगरातून लाखो प्रवासी हे केवळ चर्चगेट स्थानक गाठण्यासाठी येत असतात. त्यामुळे उपनगरासाठी शेवटचे आणि शहरातील प्रथम स्थानक असलेले चर्चगेटच समस्यांचे मूळ आगार म्हणता येईल.गेल्या महिन्याभरापासून रेल्वे अपघातांचे खापर फेरीवाल्यांवर फोडत कष्टक-यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र पश्चिम रेल्वेने रोज प्रवास करणाºया ३५ लाख प्रवाशांपैकी तब्बल ७ लाख प्रवासी हे चर्चगेटवर येत असल्याने उपनगरीय रेल्वेवरील ताण वाढत आहे. रोजगार, व्यवहार, उपचार, शिक्षण, पर्यटन, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रांची कार्यालये व ठिकाणे चर्चगेटला जोडली गेलेली आहेत. त्यामुळे उपनगरातील सर्वच स्थानकांहून शेकडो प्रवासी दर मिनिटाला चर्चगेटकडे धाव घेत असतात. त्यामुळे या गर्दीचे विकेंद्रीकरण केल्याशिवाय प्रवाशांची घुसमट थांबणार नाही.
चकाचक असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवेशद्वार उपलब्ध आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने येणारे प्रवाशांचे लोंढे अवघ्या काही मिनिटांतच स्थानकाबाहेर पडतात. चार फलाटांच्या या स्थानकावर एकही पादचारी पूल नसून स्थानकाबाहेर पडण्यास दोन भुयारी मार्ग आहेत. परिणामी, हजारो प्रवासी एकाच वेळी स्थानकाबाहेरील रस्त्यांवरील वाहतूककोंडीस कारण ठरतात.
स्थानकाच्या दक्षिणेकडून बाहेर पडणा-या भुयारी मार्गात असलेल्या गुळगुळीत लाद्या पावसाळ्यात प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतात. या लाद्यांवर पडलेले थोडेसे पाणीही प्रवाशांना उताणे पाडण्यास पुरेसे होते. त्यामुळे लाद्या बदलण्याची मागणी प्रवाशांकडून कित्येक दिवसांपासून होत आहे. तर उत्तरेकडील भुयारी मार्गात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. या भुयारी मार्गात नेहमीच पाणी साचते. त्यामुळे प्रवाशांना नाक मुरडूनच भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो.