‘आउटसोर्सिंग’ भरतीत अनाथ उमेदवारांना प्राधान्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:14 AM2021-01-08T04:14:59+5:302021-01-08T04:14:59+5:30
महिला व बालविकास विभाग : राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महिला व बालविकास विभागाने ...
महिला व बालविकास विभाग : राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला व बालविकास विभागाने नुकत्याच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत विभागाच्या मंत्री महोदयांकडे विशेष आग्रह केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून उपरोक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अनाथ उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय विभागात नोकरीमध्ये १ टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते. आता यापुढे या पदांवर अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
दहा हजारांना होणार लाभ
राज्यात विविध जिल्ह्यांतील बालगृहांमधून १८ वर्षे पूर्ण करून बाहेर पडलेल्या सुमारे १० हजार अनाथ बंधू - भगिनींना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो. या निर्णयाबद्दल अनाथांचे आधारस्तंभ असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मन:पूर्वक अभिनंदन, असे मत मुंबई येथील अनाथ प्रतिनिधी अभय तेली यांनी व्यक्त केले. तर औरंगाबाद येथील अनाथ प्रतिनिधी नारायण इंगळे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना काही अनाथ बांधवांचे पुनर्वसन होईल. अशा प्रकारचा निर्णय अन्य विभागांतदेखील घेण्याची आवश्यकता आहे.