मुंबई - ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीदेवी आणि शशी कपूर यांनी सिनेसृष्टीत दिलेल्या योगदान, त्यांच्या आठवणींना उजाळा देत या मोठ्या कलाकारांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. शशी कपूर यांनी हिंदीसोबत इंग्रजी सिनेमातही काम केले. 'द हाऊसहोल्डर', 'शेक्सपियर वल्लाह' (1965), 'बॉम्बे टॉकी' (1970) 'सिद्धार्था' (1972 ), 'हिट अँड डस्ट' असे त्यांचे इंग्रजी सिनेमे भारतातच नाहीतर परदेशातही गाजले. 4 डिसेंबर 2017मध्ये त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले. शशी कपूर यांना 2017 मध्ये फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरीदेखील करण्यात आली होती. या सर्जरीनंतर त्यांची तब्येत खालावतच गेली. यानंतर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनाही ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईमध्ये निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत त्या एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांचे निधन झाले. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. त्यावेळी एअरपोर्टवर अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचसोबत त्यांच्या फॅन्सनी देखील एअरपोर्टच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती.
शशी कपूर आणि श्रीदेवी यांनी सिनेसृष्टीमध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांना ऑस्करकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.