डिसेंबरपर्यंत ओशिवरा रेल्वे स्थानक
By admin | Published: April 2, 2016 02:29 AM2016-04-02T02:29:27+5:302016-04-02T02:29:27+5:30
हार्बरवरील अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार करतानाच यात नवीन ओशिवरा स्थानक बनविण्यात येणार आहे. मात्र गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेले हे स्थानक डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी
मुंबई : हार्बरवरील अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार करतानाच यात नवीन ओशिवरा स्थानक बनविण्यात येणार आहे. मात्र गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेले हे स्थानक डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) देण्यात आली. या स्थानकाजवळ असलेले फाटक बंद करून उड्डाणपूल बांधला जात आहे.
एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-२ मध्ये हार्बरवरील अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार करताना यात जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान नवीन स्थानक असावे, अशी मागणी स्थानिकांची होती. मात्र हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानकाजवळील फाटक बंद करणे गरजेचे होते. या फाटकातून दर दिवशी हजारो वाहने ये-जात करत असल्याने त्यांना रोड ओव्हर ब्रिज बांधून देणे आवश्यक होते. त्यासाठी रेल्वेने मुंबई पालिकेच्या मदतीने गोरेगावच्या दिशेला एक उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र पालिकेला उड्डाणपूल आपल्या हद्दीत उतरविण्यास जागा होत नसल्याने काम चांगलेच रखडले होते. उड्डाणपूल एप्रिलपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. उड्डाणपूल कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे फाटक बंद करणे शक्य होईल. फाटक बंद झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला असलेले प्लॅटफॉर्म जोडणे आणि पादचारी पुलाचे काम पूर्ण करणे आदी कामे केली जातील. त्यानंतर अन्य कामे पूर्ण करावी लागतील. यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून डिसेंबरपर्यंत ते कार्यान्वित होईल, असे एमआरव्हीसी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.