मुंबई : अध्यात्मिक गुरू रजनीश ओशो यांच्या मूळ मृत्यूपत्राची प्रत मिळवण्यास व सध्या भारतात असलेल्या मृत्यूपत्राची सत्यता तपासण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसंदर्भात पुणे आर्थिक अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) गुरुवारी उच्च न्यायालयात तपास अहवाल सादर केला. मात्र, न्यायालयाने या अहवालावर असमाधान व्यक्त करत ईओडब्ल्यूला फैलावर घेतले.ओशो यांचे मूळ मृत्यूपत्र मिळविण्यास व भारतात असलेल्या मृत्यूपत्रावरील ओशो यांच्या सह्या खऱ्या आहेत की खोट्या , हे तपासण्यासाठी तपास यंत्रणेने गेल्या सुनावणीपासून आतापर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत,’ अशा शब्दांत न्या. आर. एम. सावंत व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ईओडब्ल्यूला सुनावले. ओशो यांचे खोटे मृत्यूपत्र बनवून ट्रस्टने कोट्यवधी रुपयांची अफरातफर कोल्याचा आरोप ओशोंचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. मृत्यूपत्रावरील सह्या खºया आहेत की खोट्या हे तपासण्यासाठी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये मृत्यूपत्राच्या झेरॉक्स पाठवल्या. मात्र लॅबने सह्या खोट्या असल्याचे म्हटले आहे, असे जेठमलानी यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने पोलिसांना या मृत्यूपत्राची प्रत नामवंत लॅबमध्ये पाठविण्याचे निर्देश दिले. त्याशिवाय दिल्ली लॅबचा अहवालाही विचारात घेण्याची सूचना न्यायालयाने केली.
‘ओशो मृत्यूपत्र तपासावर असमाधानी’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 6:00 AM