ओशो रिसोर्टच्या संपत्ती विक्रीला ओशो समर्थकांनी दर्शविला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:05+5:302021-06-17T04:06:05+5:30
मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क येथे उभारण्यात आलेला बाशो रिसोर्ट विक्रीस तयार असून, यासाठी काही महिन्यांपूर्वी १०७ कोटी रुपयांची ...
मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क येथे उभारण्यात आलेला बाशो रिसोर्ट विक्रीस तयार असून, यासाठी काही महिन्यांपूर्वी १०७ कोटी रुपयांची बोलीदेखील लावण्यात आली आहे. सुत्रांकडील माहितीनुसार, याची विक्री करणाऱ्या ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला ५० कोटी रुपये आगाऊ देण्यात आले आहेत. मात्र, या संपत्तीच्या विक्रीला घेऊन ओशो समर्थकांनी नाराजी दर्शविली आहे.
ओशो आश्रम स्थापन झाल्यापासून त्याच्याशी निगडीत असलेल्या स्वामी चैतन्यकीर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात याला वाचविण्यासाठी भावनात्मक आवाहन केले. या व्यतिरिक्त आणखी ओशो समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणात आपला विरोध दर्शविला आहे. यात त्यांनी ओशो आश्रमाच्या या भूखंडाची विक्री होण्यापासून वाचविणे गरजचे आहे, असे म्हटले आहे. कारण याच्याशी जगभरातील ओशो समर्थकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.
फाऊंडेशनने धर्मादाय आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोरोना संकट काळात ३ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाले आहेत. ट्रस्टला आणखी काही पैशांची गरज आहे. यासाठी येथील भूखंड विकणे आहे तर दुसरीकडे आश्रमाचा भूखंड विक्री प्रकरणाची माहिती मिळताच ओशो यांचे शिष्य योगेश ठक्कर-स्वामी प्रेमगीत आणि किशोर रावल-स्वामी आनंद यांनी फाऊंडेशनच्या पत्राला आव्हान देत हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
जगभरातील ओशो समर्थकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, ओशो मेडिटेशनचा एक भाग असलेला बाशोच्या विक्रीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याला वाचविणे अत्यंत गरजेचे आहे, असे समर्थकांचे म्हणणे आहे. तर १४ जून रोजी धर्मादाय आयुक्त यांच्याकडून फाऊंडेशनच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. याचवेळी या संपतीच्या विक्रीला विरोध करणारे समर्थकदेखील उपस्थित होते. मात्र, तेव्हा सुनावणी झाली नाही. आता २२ जून रोजी सुनावणी होणार आहे.