मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून खासदार सुप्रिया सुळे महायुती सरकारविरुद्ध आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. राज्यातील राजकारण, विकासकामे आणि गुन्हेगारी यावर बोलताना गृहमंत्र्यांच्या राजानाम्याचीही मागणी यापूर्वी त्यांनी केली होती. त्यास, भाजपाकडून महिला नेत्या चित्रा वाघ त्यांच्यावर टीका करताना दिसून येतात. महाराष्ट्रातील प्रगतीचा वेग मंदावल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली होती. त्यावरुन, चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलंय. ओss मोठ्या ताई तुम्ही कशा पद्धतीने वाचन-मनन-चिंतन करून असे शोध लावता हो?, असा खोचक सवाल वाघ यांनी विचारला आहे.
ट्रिपल इंजिन सरकार विकासासाठी सत्तेत आल्याचे म्हणत असले, तरी विकास सोडून सर्वकाही सुरू आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे. इथले उद्योग अन्य राज्यांत पळवले जात आहेत. प्रगतीचा वेगही मंदावत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. कराड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारला लक्ष्य केलं होत. त्यांच्या या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करुन सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.
महाराष्ट्राची विकासाची गती मंदावलेली नाही उलट आमच्या कार्यकाळात ती सुधारत चाललीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२६-२७ पर्यंत पाच ट्रिलियन डॅालरची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलियन डॅालर इतका करण्याचं ध्येय समोर ठेवून आम्ही वाटचाल करतो आहोत. पाठीमागे तुम्ही असंच महाराष्ट्रातला हिरे उद्योग सूरतला चाललाय, म्हणून आवई उठवली होती. राज्याच्या हिरे उद्योगाची चमक अजून कायम आहे. एवढंच नव्हे, तर त्याला आणखी झळाळी मिळालीय, ही वस्तुस्थिती आम्ही दाखवल्यानंतर तुम्ही मूग मिळून गप्प बसलात, अशा शब्दात वाघ यांनी सुळेंवर टीका केली.
तसेच, अगोदर राज्य उद्योगांच्या बाबतीत मागे पडल्याची ओरड केली होती. श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून तुमचा बुरखा फाडावा लागला. तुमच्या काळात रखडलेल्या औद्योगिक प्रगतीचं गाडं आमच्या काळात मार्गावर आलं, हेच सत्य त्या श्वेतपत्रिकेतून समोर आलं. केवळ राजकीय विरोधक सत्तेवर आहेत, म्हणून आपल्याच राज्याच्या प्रगतीचा दुःस्वास करणं योग्य नाही ताई !!, अशी बोचरी टीकाही वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर सोशळ मीडियातून केली आहे.
भुजबळांची वक्तव्ये दंगली घडविण्यासाठी - सुळे
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांची वक्तव्ये समाजात दंगली घडवणारी वाटतात का, असे विचारले असता, हो तसेच दिसतेय, असे सांगत मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. परंतु, त्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून त्यात चर्चा करायला हवी, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली.