लॅन्सेट अहवालातील निरीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुक्त झाल्यानंतरही ५० टक्के रुग्णांना अन्य व्याधींची लागण होत असल्याचे निरीक्षण नुकतेच लॅन्सेट अहवालातून समोर आले आहे. कोरोनाचे उपचार घेण्याकरिता रुग्णालयात दाखल झालेल्या दोनपैकी एका रुग्णाला अन्य आजारांची लागण होऊन गुंतागुंत होत असल्याचे दिसून आले आहे.
लॅन्सेटच्या या अभ्यास अहवालाकरिता, ७३ हजार १९७ रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आहे. यातील ४९.७ टक्के रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर अन्य आजार झाल्याचे समोर आले आहे. ज्या रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर आजारांची लागण झाली आहे, त्या आजारांचे स्वरुप गंभीर होऊन मृत्यूचा धोकाही संभवत असल्याची बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे.
तरुण वयोगटातील रुग्णांमध्ये लाॅग कोविडही दिसून आला आहे. या रुग्णांना स्वतःची देखभाल करणेदेखील कठीण होत असल्याची गंभीर बाब अहवालात मांडली आहे. १९ ते २९ वयोगटातील २७ टक्के रुग्णांमध्ये पक्षाघात, हृदयविकाराचा धोका आणि एकूणच अवयवांवर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण ३० ते ३९ वयोगटातील रुग्णांमध्ये ३७ टक्के इतके आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही श्वसन विकारांशी निगडित आजार उद्भवणे ही प्रमुख समस्या रुग्णांमध्ये दिसून आली आहे. त्याखालोखाल मूत्रपिंड, यकृत, रक्तक्षय, हृदयविकार हे आजार सामान्यपणे आढळून आले आहेत.
कोविडनंतरही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पोस्ट कोविड समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पहिल्या लाटेच्या दरम्यान संसर्गाची तीव्रता कमी होती. परंतु, दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता वाढली, शिवाय लागण होण्याचे प्रमाणही अधिक दिसून आले. त्यामुळे सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बरे झालेल्या रुग्णांनी कोविडनंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. नियमितपणे वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार आणि योग्य जीवनशैली, संतुलित आहाराने आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होईल.
- डॉ. विकास बनसोडे, फिजिशियन