Join us

इतर मागासवर्ग विभागाचे नाव बदलले, सरकारकडून नवीन नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 7:56 PM

विभागाचे सध्याचे नाव खूप मोठे आणि विस्तारीत स्वरुपाचे आहे

मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या निर्णयात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, 5 दिवसांचा आठवडा, बालकांच्या कल्याणासाठी न्याय निधी आणि इतर मागास वर्गाचे नामकरण या निर्णयांचा समावेश आहे. सरकारने इतर मागासवर्ग विभागाच्या नावात बदल केला आहे. इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव बदलून आता बहुजन कल्याण विभाग असे करण्यात आले आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. 

विभागाचे सध्याचे नाव खूप मोठे आणि विस्तारीत स्वरुपाचे आहे. सरकारने या विभागाकडे सोपविलेल्या योजना, विभागाने नव्याने सुरू केलेल्या योजना आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून या विभागाकडे हस्तांतरीत केलेल्या योजनांचे स्वरुप पाहता विभागाचे नाव संक्षिप्त असावे, यावर एकमत झाले आहे. त्यामुळे, आजपासून इतर मागासवर्ग विभागाचा आता बहुजन कल्याण विभाग असा नामोल्लेख असणार आहे.

दरम्यान, राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील. यासोबतच दररोज 45 मिनिटांचे वाढीव काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून होणार आहे. यासोबतच, इतर मागास विभागाचे नामकरण बहुजन कल्याण विभाग असे करण्यात आले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेसरकारअन्य मागासवर्गीय जाती