अन्य एका अहवालावर ‘त्या’ डॉक्टरची सही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:27 AM2018-10-24T05:27:51+5:302018-10-24T05:27:57+5:30
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करूनही डॉ. प्रवीण शिंदे यांची सही नालासोपारा येथील लॅबच्या वैद्यकीय अहवालावर आढळून आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करूनही डॉ. प्रवीण शिंदे यांची सही नालासोपारा येथील लॅबच्या वैद्यकीय अहवालावर आढळून आली आहे. त्या पाठोपाठ ठाणे येथील गणेश क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅबमध्येही असाच प्रकार आढळून आला आहे. डॉ. शिंदे यांनी दोन्ही लॅबविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र, अशा प्रकारांतून रुग्णांचा जीव धोक्यात येण्याचे प्रमाण वाढू शकते.
एकाच वेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील ५० हून अधिक पॅथॉलॉजी लॅब्समधील वैद्यकीय अहवालांवर स्वाक्षरी केल्याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. प्रवीण शिंदे यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. याविषयी, ९ आॅक्टोबर रोजी वृत्तपत्रातून जाहीर नोटीस देऊन डॉ. शिंदे यांनी माझ्या स्वाक्षरीचा किंवा नोंदणी क्रमांकाचा गैरवापर केल्यास योग्य ती कारवाई करू, असे स्पष्ट केले होते. मात्र, असे असूनही १८ आॅक्टोबर रोजी नालासोपारा येथील गणेश लॅबच्या अहवालात डॉ. शिंदे यांची डिजिटल स्वाक्षरी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
डॉ. प्रवीण शिंदे यांनी याबाबत सांगितले की, मी वृत्तपत्रात रितसर नोटीस दिली होती. आता नालासोपारा आणि ठाण्याच्या स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, तपास सुरू आहे.