१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 05:44 AM2024-05-29T05:44:54+5:302024-05-29T05:45:31+5:30
झिरपणाऱ्या पाण्यामुळे बोगद्याला धोका नसल्याचेही केले स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाची एक बाजू ३ महिन्यांपूर्वी ११ मार्च रोजी खुली करण्यात आली. आता दुसरी बाजू येत्या १० जूनपर्यंत खुली करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. यामुळे मुंबईतील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाच्या बोगद्यातून ‘एक्सपान्शन जॉईंट’मधून झिरपणाऱ्या पाण्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी केली. यावेळी झिरपणाऱ्या पाण्यामुळे बोगद्याला काही ही धोका नसून संरचनात्मक रोड वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोस्टल रोडमधील गळतीची माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याची पाहणी केली, त्यांच्यासोबत एल अँड टीची टीम आणि कोस्टल रोडसाठी बांधण्यात आलेल्या बोगद्याचे तज्ज्ञही उपस्थित होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या गळतीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या सूचना त्यांनी दिली असून जिथे गळती आहे फक्त तिथेच लक्ष न देता बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या २५ जॉइंट्सची दुरुस्ती करावी असे त्यांनी नमूद केले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे काम केले जाणार असून यात तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, या कामामुळे वाहतुकीला अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोस्टल रोडसाठी उशीर का?
- मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता. मात्र आताच्या भ्रष्ट सरकारमुळे या कामाला विलंब झाल्याची टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. या सरकारने प्रकल्पाला उशीर तर केलाच, मात्र प्रकल्पखर्चात वाढही केली, असाही आरोप त्यांनी केला.
- शेवटी निवडणूक जवळ आल्यानंतर कोस्टल रोडची एक बाजू खुली करण्यासाठी शिंदे सरकारकडून घाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
- कोस्टल रोड अजूनही पूर्णपणे सुरु झाला नसून तारीख पे तारीख दिली जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. शिवाय जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करू, असा इशारा त्यांनी दिला.