मुंबई - राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. राज्याच्या या अनलॉक मॉडेलचं चांगलं कौतुक होत आहे.
राज्यात ३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, बहुतांश जिल्ह्यात सोमवारपासून दुकाने उघडणार आहेत.
महाराष्ट्रात उद्यापासून हटविण्यात येत असलेल्या लॉकडाऊन मॉडेलचं देशातील इतरही राज्यांनी अनुकरण करायला हवं. अतिशय समजूतदारपणे आणि सायंटीफीक ग्रॅडेड मॉडेलचं हे महाराष्ट्र मॉडेल आहे, असे म्हणत हर्ष गोएंका यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनलॉक मॉडेलचं कौतुक केलं आहे. 'लॉकडाऊन आणि क्नॉकडाऊन'मधला हा सुवर्णमध्य असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. कोरोनालाही रोखायचं आहे अन् अर्थव्यवस्थेलाही मजबूत करायचं आहे, असेही ते म्हणाले.
आनंद महिंद्रांकडूनही कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनसंदर्भातील ट्विटला रिट्विट करत, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. पारदर्शक, कृतीशील आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यांचे हेच दिलासादायक आणि व्यवहार्यपूर्ण विधान ऑक्सिजनची पूर्तता आणि टीपी रेटला धरुन आहे, असे आनंद महिंद्र यांनी म्हटलंय.