Join us  

'अन्यथा डॉक्टरांवर होणार कारवाई'; ‘जेजे’ प्रशासनाने नेमली समिती; ४ अध्यापकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 6:38 AM

या समितीत चार मार्ड सदस्यांनाही करण्यात आले समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रुग्णालयात औषधे, सर्जिकल मटेरियल्स उपलब्ध असतानाही जे. जे रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना बाहेरून या गोष्टी विकत आणण्यासाठी चिठ्ठ्या लिहून देत असल्याच्या तक्रारी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी या अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा डॉक्टरांवर कोणती कारवाई असावी, हे निश्चित करण्यासाठी रुग्णालयातील प्राध्यापक आणि निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आठ सदस्य असून रुग्णालयातील ४ अध्यापकांचा आणि चार मार्ड सदस्यांचा समावेश आहे.

जे. जे. रुग्णालय प्रशासनाने १२ ऑगस्ट रोजी या संदर्भात प्राध्यापकांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यामध्ये रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे एखाद्या डॉक्टराने बाहेरून आणण्यास सांगितले आणि ते सिद्ध झाले तर त्या डॉक्टरवर कोणत्या स्वरूपाची कारवाई हे निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जनरल सर्जरी विभागप्रमुख डॉ. अजय भंडारवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तक्रारी दाखल

अनेकवेळ राजकीय प्रतिनिधी आणि आमदार या विषयावर विविध व्यासपीठांवरून याबाबत आपली मते उघडपणे व्यक्त करत असतात. काहीवेळा रुग्णसुद्धा रुग्णालय तक्रारी दाखल करत असतात, तर काही वेळा रुग्णालय प्रशासनाला या काही गोष्टी निदर्शनास आल्यावर त्या संबंधित डॉक्टरांना जाब विचारत असतात. सरकारी रुग्णालयातच नव्हे, तर महापालिकेच्या काही रुग्णालयांत गोळ्या, औषधे उपलब्ध नसताना त्यांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जाते. 

रुग्णांना आर्थिक झळ

गरीब रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, त्यांना अशावेळी जर बाहेरची चिट्ठी लिहून औषधे आणि रक्तचाचण्या करण्यास सांगितले तर त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत असते. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, औषधे, सर्जिकल मटेरियल्स उपलब्ध नसतील किंवा रक्तचाचण्या येथे होणार नसतील तर ठीक आहे. त्या उपलब्ध असणे अपेक्षितच आहे. मात्र, नसतील तर बाहेरून आणण्यास सांगणे एखाद्या वेळी चालू शकते. मात्र, रुग्णालयात उपलब्ध असूनही जर बाहेरून या गोष्टी आणण्यास सांगणे चुकीचे आहे.

टॅग्स :मुंबईजे. जे. रुग्णालयप्राध्यापकमार्ड