Join us

...अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर देऊ; राज ठाकरेंचा कडक इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 4:52 PM

तुम्ही जी ताकद दाखवली त्यासाठी मी शतश: ऋणी आहे, मोर्चाला उत्तर मोर्चानेच असेल असं सांगितलं होतं त्यांना चोख उत्तरं दिलं.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. यापुढे दगडाला दगड आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल. इतर देशापेक्षा भारताने तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे एकोप्याने राहा, देशाशी वाकडं घेऊ नका. हा देश साफ करावा लागेल. केंद्राला कारवाई करावी लागेल अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे. 

आझाद मैदानातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, शहरातील एक जागा अशी आहे त्याठिकाणी परदेशातून मुल्लामौलवी येतात. तिथे मोठं षडयंत्र सुरु आहे. याबाबत मी लवकरच राज्याच्या, केंद्राच्या गृहमंत्र्यांशी भेट घेणार आहे. मुंबईतील पोलिसांनी ४८ तास हात मोकळे करा, राज्यातील क्राईम रेट शुन्य टक्क्यांवर आणू शकतात. हात बांधलेले आहेत. काही करायला गेले तर त्यांच्यावर कारवाई होणार असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुम्ही जी ताकद दाखवली त्यासाठी मी शतश: ऋणी आहे, मोर्चाला उत्तर मोर्चानेच असेल असं सांगितलं होतं त्यांना चोख उत्तरं दिलं. सीएए आणि एनआरसी असेल, जे जन्मापासून इथे राहतायेत त्यांना थोडी बाहेर काढणार आहे? मग जे कायद्यात नव्हतं मग कोणासाठी ही ताकद दाखवली? घुसखोरांना हाकलचं पाहिजे त्यात तडजोड होऊच शकत नाही. व्हॉट्सअपवर मॅसेज पसरवले जातात. अनेकांना सीएए आणि एनआरसीबाबत माहितीही नाही असं सांगत राज ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान, इतर देशात धार्मिक अत्याचार होत असतील तर भारत नागरिकत्व देईल. १९५५ सालचा हा कायदा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला. १९५५ सालची परिस्थिती वेगळी होती. आज २०२० सालची परिस्थिती वेगळी आहे. भारतापासून पाकिस्तान विभक्त झाला होता. पण आज परिस्थिती वेगळी आहे. एकतर तुम्ही डाव्या बाजूला राहा नाहीतर उजव्या बाजूला राहा, केंद्र सरकारवर टीका केली तर भाजपाविरोधी, केंद्र सरकारचं कौतुक केलं तर भाजपासोबत असं बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. काश्मीरमधलं कलम ३७० काढलं तेव्हा राज ठाकरेंनी अभिनंदन केलं. कोर्टाकडून राम मंदिराला हिरवा कंदील मिळाला तेव्हाही बाळासाहेब असायला हवे होते असं म्हटलो, राम मंदिर ट्रस्टची स्थापना केली तेव्हाही अभिनंदन केले अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी घेतली. 

त्याचसोबत पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे. अमेरिकेत जो दहशतवादी हल्ला झाला होता. त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, लोकं मारलं गेली या स्फोटामागे कोण होतं? मुंबई १९९२ साली बॉम्बस्फोट झाले ते घडवले त्यांना पाकिस्तानाने थारा दिला. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणार, मुस्लिमांना देणार या लोकांना कसं घेणार? माझा देश धर्मशाळा आहे का? कोणीही कुठेही यावं, राहावं, बाहेरुन येणाऱ्या घुसखोरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माणुसकीचा ठेका प्रत्येकवेळी भारताने घेतला नाही. इतर देशांमध्ये पोलिसांकडून कारवाई होते, पासपोर्ट नाही त्याला तात्काळ दोन पर्याय देतात. एकतर तुला देशात परत पाठवतो अन्यथा जेलमध्ये टाकतो. मग माणुसकीचा ठेका भारतानेच घेतला का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. देशातील आर्थिक परिस्थितीकडे डोळेझाक करण्यासाठी हे कायदे आणत असाल तर ते चुकीचं आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी इतकी कठोर करा की दूध का दूध, पानी का पानी झालं पाहिजे असं सांगत केंद्र सरकारला आवाहन केलं.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेहिंदुत्वमुस्लीमपाकिस्तानबांगलादेश