Join us

...अन्यथा ‘बेस्ट’ बंदचा इशारा

By admin | Published: July 25, 2015 3:11 AM

बेस्ट बसेसच्या चालक आणि वाहकांसाठी प्रशासनाने आणलेल्या कॅनेडियन वेळापत्रकाविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई : बेस्ट बसेसच्या चालक आणि वाहकांसाठी प्रशासनाने आणलेल्या कॅनेडियन वेळापत्रकाविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. १० तासांपेक्षा मोठ्या ड्युट्यांची संख्या वाढणार असल्याबद्दल रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे चालक आणि वाहकांनी ड्युट्यांवर बहिष्कार टाकला आहे. प्रशासनाने चालक व वाहकांना ड्युट्या भरण्यास जबरदस्ती केल्यास बंद पुकारण्याचा इशारा, त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष उदयकुमार आंबोणकर म्हणाले, ‘याआधी पारंपरिक पद्धतीने चौमाही कामासंदर्भात ड्युट्या तयार केल्या जात होत्या. मात्र त्यात सुधारणा करण्याच्या निमित्ताने बेस्ट प्रशासनाने कॅनेडियन वेळापत्रक आणले. त्याविरोधात संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असता, बेस्ट प्रशासनाने वेळापत्रकातील १३ मुद्द्यांत सुधारणा करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र त्याप्रमाणे कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. १ आॅगस्टपासून नवे वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे बेस्ट चालक आणि वाहक यांना १० ते १२ तासांच्या त्रासदायक ड्युट्या कराव्या लागतील. चालक-वाहकांसाठी डेपोमध्ये आरामगृहांमध्ये काडीमात्र बदल केलेला नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.’...तर आजपासून बेस्ट बंद!१ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या वेळापत्रकासाठी चार दिवसांत ड्युट्या भरणे गरजेचे आहे. मात्र शुक्रवारी मोठ्या संख्येने चालक आणि वाहकांनी ड्युट्यांवर बहिष्कार टाकला. या वेळी बहुतेक डेपोंबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शनिवारी प्रशासनाने चालक व वाहकांवर जबरदस्ती केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. काम बंदचा इशाराही संघटनेने दिला आहे.

न्यायालयात जाणारकॅनेडियन वेळापत्रक, बेस्ट आगारातील स्वच्छतागृह, विश्रांतीगृहांच्या स्थितीत बदल करण्याचे प्रशासनाने मान्य केले होते. मात्र यापैकी कशातही बदल केला नसल्याने प्रशासनाविरोधातन्यायालयात धाव घेणार असल्याचे उदयकुमार आंबोणकर यांनी सांगितले.

वाहकाविना बेस्ट चालू देणार नाहीमोटर वाहन कायद्यानुसार बस चालवताना चालकासोबत वाहक असणे बंधनकारक आहे. मात्र १ आॅगस्टपासून सीएसटी-नरिमन पॉइंट, सीएसटी-वर्ल्ड ट्रेड सेंटर, चर्चगेट-नरिमन पॉइंट, चर्चगेट-वर्ल्ड ट्रेड सेंटर या मार्गांवर सुरू असलेल्या विशेष सेवांमध्ये वाहकाशिवाय बससेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे संघटनेने सांगितले. त्याचा विरोध करत वाहक नसलेली बस चालक चालवणार नाहीत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. चालक आणि वाहकांनी शुक्रवारी ड्युटी वाटपावर बहिष्कार टाकला. संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने शुक्रवारी दिलेल्या तक्त्यामध्ये दोन्ही पाळ्यांमध्ये काम करताना एकच बसमार्ग असलेल्या ड्युट्या देणे अपेक्षित होते.

मात्र अशा पद्धतीच्या केवळ ३९ टक्के ड्युट्या शेड्युलमध्ये आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार १० तासांपेक्षा जास्त वेळ असलेल्या ड्युट्यांमध्ये कपात करणे अपेक्षित होते. मात्र तक्त्यात १० तासांहून अधिक वेळ असलेल्या ड्युट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.

रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे आणि दोन वेगवेगळे बसमार्ग असल्यास वाहक आणि चालकांचा अधिक वेळ जातो. प्रशासनाने फसवी आकडेवारी समोर आणत कुटिल डाव खेळल्याचा संघटनेचा आरोप आहे.बेस्टवरील ताण वाढलाबेस्टच्या १ आॅगस्ट २०१३ सालच्या जुन्या वेळापत्रकात एकूण ९ हजार ८१० ड्युट्या होत्या. तर १ आॅगस्ट २०१५ सालच्या नुसार नव्या वेळापत्रकानुसार ८ हजार ७८० ड्युट्या आहेत. याचाच अर्थ गेल्या दोन वर्षांत प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रशासनाने १ हजार ३० ड्युट्या कमी केल्या आहेत. म्हणजेच बेस्ट बस आणि अप्रत्यक्षरीत्या चालक आणि वाहकांवरील ताण वाढल्याचा दावा संघटनेने केला आहे.