Join us

...अन्यथ पाणी तोडू

By admin | Published: November 22, 2014 1:22 AM

निवडणुकांचे कारण सांगून पाणी बिल उशिरा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता प्रामाणिक ग्राहकांवरच कारवाई सुरू केली

नामदेव मोरे, नवी मुंबईनिवडणुकांचे कारण सांगून पाणी बिल उशिरा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता प्रामाणिक ग्राहकांवरच कारवाई सुरू केली आहे. सात दिवसात बिले भरा, अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला असून यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने दर दोन महिन्यानंतर नागरिकांना बिले देण्यात येतात. जुन व जुलै महिन्याचे बिल सप्टेंबरपर्यंत नागरिकांना देणे आवश्यक होते. परंतु या दरम्यान निवडणुका असल्यामुळे प्रशासनाने बिले वाटलीच नाहीत. आॅक्टोबरअखेर व काही ग्राहकांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बिले देण्यात आली. बिल भरण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर असल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. अनेक गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी सुट्टीवर असल्यामुळे व इतर कारणांमुळे बिले वेळेत भरता आली नाहीत. या सर्व ग्राहकांवर आता महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. शेकडो ग्राहकांना पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी सात दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागातील ठेकेदाराचे कर्मचारी घरोघरी जाऊन व सोसायटीतील नागरिकांना नोटीस देत आहेत. तुम्ही बिले भरली नसल्यामुळे तुमच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात येत आहे. महापालिकेच्या नोटीसमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक ग्राहक नियमित बिले भरत आहेत. महापालिका प्रशासनाने जवळपास दीड ते दोन महिने उशिरा बिले दिली. स्वत:ची चूक असताना प्रशासन थेट ग्राहकांना वेठीस धरत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. नेरूळ परिसरात शुक्रवारी १०० पेक्षा जास्त ग्राहकांना नोटीस देण्यात आल्या. याविषयी अनेकांनी नेरूळ कार्यालयात जावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील कर्मचाऱ्यांनी निवडणुका असल्यामुळे आम्ही वेळेत बिले देऊ शकलो नाही. परंतु ग्राहकांनी मात्र वेळेतच बिले भरली पाहिजेत असे उद्धटपणे सांगण्यात येत होते. आठ दिवसानंतर पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नेरूळ कार्यालयामधील कनिष्ठ पाणीपुरवठा अभियंता सचिन ढमाळ व उपअभियंता संजय पाटील यांच्याशी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता दोघेहे कार्यालयात उपस्थित नव्हते. दोघांनीही मोबाइल बंद ठेवले होते.