Join us

...अन्यथा आंदोलन पुकारणार

By admin | Published: July 13, 2016 4:00 AM

परिवहन सेवा अत्यंत अपुरी असल्याचे सांगत, एमएमआरटीएने (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) कंत्राटी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या खासगी एसी बसेसला म्हणजेच मॅक्सी कॅब चालवण्यासाठी परवानगी दिली.

मुंबई : परिवहन सेवा अत्यंत अपुरी असल्याचे सांगत, एमएमआरटीएने (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) कंत्राटी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या खासगी एसी बसेसला म्हणजेच मॅक्सी कॅब चालवण्यासाठी परवानगी दिली. याची अंतिम मंजुरी शासनाकडून जरी मिळवण्यात येणार असली, तरी तत्पूर्वी मॅक्सी कॅबला जोरदार विरोध सार्वजनिक परिवहन सेवा संघटनांकडून करण्यात आला आहे. खासगी एसी बसेस धावल्यास परिवहन सेवांचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे त्याला परवानगी देऊ नये, अन्यथा आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल,वसई-विरार, कल्याण-डोंबिवली या एमएमआरटीए क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक परिवहन सेवांच्या बसेस धावतात. यामध्ये परिवहन सेवांच्या एसी बस सेवांचाही समावेश आहे. मात्र, परिवहन सेवा अत्यंत अपुरी असल्याचे सांगत प्रवाशांना सक्षम पर्याय उपलब्ध करण्यात यशस्वी झालेले नसल्याचे एमएमआरटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एसटी महामंडळ तर सध्या राज्यात प्रवाशांची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे त्रस्त झाली आहे. त्यामुळे प्रवासी कमी होतानाच उत्पन्नही बुडत असल्याने ते वाढवण्यावर त्यांच्याकडून भर दिला जात आहे. एसटीकडून तर आधीपासूनच मॅक्सी कॅबला विरोध होत असतानाच एमएमआरटीए क्षेत्रात त्याला परवानगी देण्यात आल्याने एसटी संघटना आक्रमक भूमिका झाल्या आहेत.महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले की, ‘हा एक प्रकारे खासगीकरणाचा डाव आहे. एसटीचे अस्तित्व धोक्यात येईल. सध्या प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी भर दिला जात आहे. यात खासगी एसी बसेसना परवानगी दिली, तर एसटीचे एमएमआरटीए क्षेत्रातील अस्तित्व संपेल,’ असे सांगितले. (प्रतिनिधी)