मुंबई : महापालिकेत कामवजा १२ टक्के कमी दराने कंत्राट निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला आता ऑनलाइन अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. कार्यादेश मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला १५ दिवसांमध्ये डिमांड ड्राफ्ट भरण्याची सूट देण्यात येणार आहे. मात्र दिलेल्या मुदतीत ठेकेदाराने रक्कम न भरल्यास त्याला दोन वर्षे महापालिकेत काम मिळणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.सध्या ऑनलाइन ई-निविदा प्रक्रियेद्वारे वजा १२ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला प्रत्येक टक्क्याला एक टक्का याप्रमाणे कोणतीही मर्यादा न ठेवता अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ऑनलाइन स्वीकारली जाईल. या तरतुदीमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेत पात्र ठेकेदरांकडून सर्वात कमी दराची निविदा प्राप्त झाल्यास कार्यादेश देण्याची मंजुरी मिळाल्यानंतर त्याने १५ दिवसांत अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट स्वरूपात देणे बंधनकारक असणार आहे.तसेच कामाचा कार्यादेश मिळाल्यानंतर दिलेल्या मुदतीत अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ठेकेदाराने जमा न केल्यास दोन वर्षे काम बंद करण्यात येईल. तसेच भरणा केलेली इसारा अनामत रक्कम पूर्णपणे जप्त करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कंपनीचे संचालक, भागीदार इतर कंपनीचे संचालक अथवा भागीदार असल्यास दोन वर्षे त्यांना प्रतिबंधित करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर पालिकेची नजर राहणार आहे.
...अन्यथा ठेकेदाराचे काम दोन वर्षे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 2:03 AM