Join us  

अन्यथा हॉटेल्स ठरतील मृत्यूचे सापळे

By admin | Published: July 06, 2016 2:50 AM

कायद्यानुसार अग्निरोधक यंत्र न ठेवणारी हॉटेल्स व दुकाने मृत्यूचा सापळा ठरतील, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला सर्व दुकाने व हॉटेल्स कायद्याचे पालन करत

मुंबई : कायद्यानुसार अग्निरोधक यंत्र न ठेवणारी हॉटेल्स व दुकाने मृत्यूचा सापळा ठरतील, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला सर्व दुकाने व हॉटेल्स कायद्याचे पालन करत आहेत की नाहीत, याची तपासणी करण्याचा आदेश दिला. ज्या दुकानांत किंवा हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रे आढळणार नाहीत, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले.‘हॉटेल्स, दुकाने व कार्यालयांनी अग्निप्रतिबंधासाठी उपाययोजना न केल्यास आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,’ असे निरीक्षण न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने नोंदवले. महापालिकेच्या हद्दीतील दुकाने आणि हॉटेल्स आवश्यक ती खबरदारी घेतात की नाही, याची पाहणी करा. ज्यांनी खबरदारी घेतली नसेल त्यांच्यावर काय कारवाई केली, याची माहिती ३१ आॅगस्टपर्यंत द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले.मुंबई दुकाने व आस्थापने कायद्यानुसार, दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापनांमध्ये अग्निरोधक यंत्रे बसवणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील २१ हॉटेल्स कायद्याचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश महापालिकेला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका वकील दिनेश सोहानी यांनी केली आहे. दादरच्या प्रकाश, आस्वाद आणि गिरगावच्या तांबे हॉटेल्सचाही यात समावेश आहे. बहुतांशी हॉटेल्स दादर, सांताक्रूझ, गिरगाव, अंधेरी आणि माहीम या विभागातील आहेत.या सर्व हॉटेल्सना अग्निशमन यंत्र ठेवण्याबाबत पत्रे लिहिली. मात्र सर्व निरर्थक ठरल्याचे सोहानी यांनी याचिकेत म्हटले आहे. बहुतांशी हॉटेल्स इमातीच्या तळमजल्यावर असल्याने इमारतींमधील रहिवाशांना धोका आहे. ही हॉटेल्स लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. कायद्याचेही उल्लंघन करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी) ‘सिटी किनारा’च्या दुर्घटनेनंतरही ‘जैसे थे’ कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एका महिलेसह आठ जणांचा बळी गेला. या घटनेला १० महिने उलटले तरी त्याच्या कटू आठवणी जिवंत आहेत. या घटनेनंतर हॉटेलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. मात्र अजूनही छोटेखानी हॉटेलमध्ये राजरोसपणे नियमांचे उल्लंघन करत नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.सिटी किनारा हॉटेलच्या तळमजल्यावर मुदपाकखाना आणि वरच्या मजल्यावर खवय्यांची बसण्याची व्यवस्था होती. वरच्या मजल्यावर एक रिकामा आणि दोन भरलेले गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. भरलेले गॅस सिलिंडर पाइपच्या साहाय्याने तळमजल्यावरील शेगडीला जोडण्यात आले होते. या पाइपमधून गॅसची गळती झाल्याने ही आग लागली होती. या अग्नितांडवातील मृतांमध्ये डॉन बॉस्को महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा समावेश होता. या घटनेने सर्वांनाच सुन्न केले होते. त्यानंतर पालिका आणि अग्निशमन दलाकडून हॉटेलांतील अग्निसुरक्षेसंदर्भात कारवाईला सुरुवात झाली. मुंबईतील मोठी हॉटेल आणि मॉल्सना परवाना विभागाकडून आॅडिट करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या प्रमाण प्रणालीचे बी सर्टिफिकेट अग्निशमन दलाकडे सुपुर्द करणे बंधनकारक आहे. मुळात मोठ्या हॉटेल्सना जी अग्निरोधक यंत्रणा पुरविण्यात येते तिचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शिवाय छोटेखानी हॉटेल्समध्येही अग्निरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे. अग्निशमन दलाकडून प्रमाणपत्र घेऊन हॉटेलबाहेर फायर सेफ्टीचा बोर्ड लावणे गरजेचे आहे. हॉटेल्सवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली.अडीच हजार कर्मचारीमुंबईतील ३३ अग्निशमन केंद्रांत अडीच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. अशात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अनेकदा या कर्मचाऱ्यांना अपुरे मनुष्यबळ, वाहतूककोंडी, अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसणे अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.