...अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल; मुंबईच्या महापौरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:36 AM2021-02-17T05:36:31+5:302021-02-17T05:37:15+5:30
mumbai mayor kishori pednekar : गेल्या दोन आठवड्यांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात दररोज ३०० ते ३५० रुग्ण आढळत होते. मात्र आता दररोज सरासरी ६०० ते ६५० रुग्ण आढळून येत आहेत.
मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. १ फेब्रुवारीपासून मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिल्यानंतर गर्दी वाढल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार व महापालिकेला पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात दररोज ३०० ते ३५० रुग्ण आढळत होते. मात्र आता दररोज सरासरी ६०० ते ६५० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आढावा घेऊन रुग्णसंख्येतील वाढ मोठी
असल्यास लोकलबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर मंगळवारी प्रसारमाध्यमांशी
संवाद साधताना महापौरांनी
वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.
लस घेण्याचे सर्व मुंबईकरांना आवाहन
बहुतांश नागरिक मास्कविना फिरत आहेत. लोकांनी नियमांचे पालन करायला हवे. आपल्याला लॉकडाऊन पुन्हा नको आहे, त्यासाठी खबरदारी घ्यायला हवी. असे महापौर म्हणाल्या. तसेच कोविड प्रतिबंधक लस आपण लवकरच घेणार आहोत. ही लस सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.