...अन्यथा अनेक देश जातील पाण्याखाली
By admin | Published: September 4, 2016 08:19 AM2016-09-04T08:19:17+5:302016-09-04T11:12:42+5:30
जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे़ ही वाढ चिंताजनक आहे़ केवळ साडेचार अंशाने तापमान वाढली तर समुद्राची उंची तब्बल दोन मीटरने वाढेल.
पवन देशपांडे
मुंबई, दि. ४ - जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे़ ही वाढ चिंताजनक आहे़ केवळ साडेचार अंशाने तापमान वाढले तर समुद्राची उंची तब्बल दोन मीटरने वाढेल आणि त्यामुळे अनेक देश पाण्याखाली जातील. हे थांबवायचे असेल तर कार्बन उत्सर्जनाला लगाम लाववी लागेल अन्यथा विनाश पक्का आहे, असा इशारा अमेरिकेचे विशेष दूत डॉ. जोनाथन परशिंग यांनी दिला़.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनात हवामान बदल यासंदर्भात डॉ़ परशिंग हे विशेष दूत आहेत़ ते भारत सरकारशी याविषयी चर्चा करण्यासाठी भारतात आले आहेत़ मुंबई दौऱ्यात त्यांचा सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात वार्तालाप झाला़ यावेळी ते म्हणाले, उद्याचे आयुष्य आपल्याला चांगले जगायचे असेल, तर आजच उपाय योजने गरजेचे आहे़ हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढले आहे़ यात चीन आणि अमेरिकाही अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे़ इतर जगाच्या तुलनेत ही दोन राष्ट्र सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करत आहेत़.
विविध राष्ट्राचा वाटा वेगळा आहे़ पण परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. त्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसत आहे़ कधी जोरदार पाऊस पडतोय तर कधी उन्हाचा पारा चढतो आहे. हे थांबवण्यासाठी कार्बन उत्सर्जन घटवावे लागेल आणि त्याला लगाम लावण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत़ सरकारी पातळीवर धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत.
आपल्या रोजच्या जीवनात थोडा बदल करायला लागेल़ वीज वापरापासून सुरुवात जरी केली तरी कमी उर्जा लागेल असे तंत्रज्ञान वापरावे लागेल़ कारण विजनिर्मिती वाढल्याने कार्बन उत्सर्जनही वाढत आहे़ त्यासाठी आपल्याला मिळून काम करावे लागेल, असेही डॉ. परशिंग म्हणाले़
सारेच देश एकत्र
कार्बन उत्सर्जन थांबवण्यासाठी सारेच देश काम करत आहेत़ अमेरिकेने सुरुवात केली आहे़ जे साहित्य कार्बन उत्सर्जनाचे नियम पाळून तयार करण्यात आले आहेत तेच साहित्य खरेदी करण्याचा आमच्या सरकारचा कल असतो, असेही डॉ़ परसिंग यांनी स्पष्ट केले़
पर्यायी उर्जेचा वापर वाढवावा लागेल
चीनमध्ये ५० कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचली़ मात्र हे उद्दिष्ट गाठताना तेथे कार्बन उत्सर्जनाचे भान ठेवले गेले नाही़ भारतातही जर गावोगावी अशाच प्रकारे वीज पोहोचवली गेली तर येथेही विजनिर्मिती वाढेल, पर्यायाने कार्बन उत्सर्जनही वाढेल़ कारण भारतात औष्णिक उर्जानिर्मितीचे प्रमाण अधिक आहे़ नवतंत्रज्ञानाद्वारे याला पर्याय शोधावा लागेल़ पर्यायी उर्जेचा वापर वाढवावा लागेल आणि सौर-पवन उर्जेचे तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात उपबल्ध करावे लागतील, असेही डॉ़ परसिंग यांनी सांगितले़