...अन्यथा मराठी नाटक बुडाले म्हणण्याची येईल वेळ - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:23 AM2019-01-07T06:23:06+5:302019-01-07T06:23:29+5:30
राज ठाकरे : मराठी नाटक बदलण्याची गरज, निर्मात्यांना केले आवाहन
पुणे : टीव्हीवरील मालिकांनी आपला स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार केला आहे तसा वर्ग मराठी नाट्यनिर्मात्यांनी निर्माण करणे गरजेचे आहे. आशयाबरोबरच सादरीकरणात देखील योग्य तो बदल केल्यास नाटकांकरिता प्रेक्षक तयार होईल. अन्यथा मराठी नाटक बुडाले अशी म्हणण्याची वेळ मराठी नाट्यनिर्मात्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
थर्ड बेल एंटरटेनमेंट च्यावतीने कलातीर्थ पुरस्कार, निर्मिती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात ठाकरे बोलत होते. याप्रसंगी नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे, अतुल केळकर आणि सोनिया कोनशेट्टी उपस्थित होते. मराठी नाटके आणि नाट्यनिर्माते याविषयी राज म्हणाले, परदेशात नाटकांमधील जिवंतपणा, त्याचे निर्मितीमूल्य उच्च स्वरुपाचे असते. नाटक पाहताना तो विषय नाटकाचाच आहे याची खात्री पटते. त्याची विलक्षण कमाल वाटते. आपल्याकडील नाटकांचा आशय व त्याचे निर्मितीमूल्य एका चौकटीत बसविण्यासाठी अनुभवी कलाकारांना बोलते करायला हवे. मराठी नाटक आता बदलणे गरजेचे आहे. जुने -नवे वाद टाळून नाटकांकडे प्रेक्षक कसा येईल याचा विचार निर्मात्यांनी करावा. आता पूर्वीचा प्रेक्षक राहिला नाही. ही सगळी परिस्थिती समजावून घेताना चॅनेलवरच्या गोष्टी सोडून मराठी नाटक करावे लागेल. अन्यथा मराठी नाटक बुडण्याची वेळ आली असे म्हणण्याची वेळ निर्मात्यांवर येईल. त्यामुळे मराठी नाट्यनिर्मार्त्यांनी संहितेत देखील बदल करायला हवा.
१० निर्माते, निर्मिती संस्थांचा गौरव
यंदा मराठी मनोरंजन सृष्टीतील १० निर्मात्यांना व निर्मिती संस्थांना गौरविण्यात आले. यात सुनील फडतरे (श्री गणेश फिल्मस), प्रसाद कांबळी (भद्रकाली प्रॉडक्शन), संदेश भट (सुयोग प्रॉडक्शन), शुभांगी दामले (महाराष्ट्र कल्चरल सेंटर), अरुण काकडे (अविष्कार थिएटर्स), शशांक सोळंकी (सेवंथ सेन्स मीडिया), ॠषीकेश देशपांडे (इंडियन मॅजिक आय) यांचा समावेश होता. यावेळी निवेदक संदीप पंचवाटकर व निवेदिका मंजिरी जोशी यांना भाऊ मराठे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.