मुंबई - लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टिपण्णी केली होती. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना इशारा दिला आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असे चाकणकर यांनी म्हटलं आहे.
चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, त्यांनी प्रवीण दरेकर यांना स्पष्ट इशारा दिलाय. दरेकर यांनी पुण्यात शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त टिपण्णी केली होती. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष' असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. तसेच, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून संताप व्यक्त केला जात आहे.
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरसोबत लोकगायक ‘शांताबाई’ फेम संजय लोंढेही येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा प्रवेश सोहळा रंगणार आहे. मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कलाकारांचा ओघ वाढतच चालला आहे. दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. गायिका वैशाली माडे, कलाकार मेघा घाडगे, सविता मालपेकर अशा अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. आता शांताबाई फेम संजय लोंढे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासह १२ कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
आटपाडीत रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर
रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसिध्द करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी आटपाडीचे पोलीस निरीक्षक भानुदास निभोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.