मुंबई : रक्तपेढ्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी जारी केल्या. त्यानुसार गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांकडून जबर दंड वसूल करण्यात येणार आहे.
थॅलेसेमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क वसूल करणे, संकेतस्थळावर दररोजचा रक्तसाठा न दर्शविणे, प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम आकारणे अशा अनेक तक्रारी आल्यानंतर शासनाने मार्गदर्शन सूचना जारी केल्या. राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या बैठकीत दंडात्मक कारवाईबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्या आधारे या सूचनांचे स्वरुप निश्चित करण्यात आले.
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद/राज्य रक्त संक्रमण परिषदेने ठरवून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा आकारणी केल्यास जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाच पट दंड यापैकी जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
...अन्यथा दंडात्मक कारवाई होणार
- थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडित इतर आजारी रुग्णांकडे ओळखपत्र असूनही प्रक्रिया शुल्क आकारल्यास शुल्काच्या तिप्पट दंड पडेल. पैकी प्रक्रिया शुल्क रुग्णास परत केले जाईल आणि उर्वरित राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा केले जाईल.
- रक्तसाठा असूनही ते वितरित करण्यास नकार दिल्यास रुग्णास द्यावे लागलेले प्रक्रिया शुल्क अधिक एक हजार रुपये दंड लागेल. शुल्क रुग्णास परत करून अन्य रक्कम परिषदेच्या खात्यात जमा होईल. संकेतस्थळावर रक्तसाठा व संबंधित माहिती न भरल्यास दररोज एक हजार रुपये दंड आकारला जाईल. अनिवार्य माहिती न भरल्यास दररोज ५०० रुपये दंड आकारला जाईल.