अन्यथा शाळा बंद पाडू
By admin | Published: June 1, 2017 06:07 AM2017-06-01T06:07:56+5:302017-06-01T06:07:56+5:30
दहिसरचे युनिव्हर्सल स्कूल बंद करण्याचा इशारा शिवसेनेने बुधवारी शाळा प्रशासनाला दिला. फीवाढीला विरोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसरचे युनिव्हर्सल स्कूल बंद करण्याचा इशारा शिवसेनेने बुधवारी शाळा प्रशासनाला दिला. फीवाढीला विरोध सुरू असताना, ७० विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची नोटीस या शाळेने बजावल्याविरोधात शिवसेनेने आंदोलन छेडले होते.
शाळेच्या दीडशे विद्यार्थ्यांचे पालक गेल्या चार महिन्यांपासून शाळेच्या अवाजवी फीवाढीचा विरोध करत आहेत. हे माहीत असतानाही या शाळेतील ७० मुलांना काढून टाकल्याची नोटीस या शाळेच्या प्रशासनाकडून बजावण्यात आली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत, बुधवारी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शाळेविरुद्ध आंदोलन केले. ‘विद्यार्थ्यांना परत घ्या, अथवा शाळा बंद पाडू’, असा धमकीवजा इशारा सेनेने या वेळी शाळा प्रशासनाला दिला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेत, मुलांना परत शाळेत न घेतल्यास शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर देऊ, असे बजावल्यावर याप्रकरणी एक बैठक बोलावून चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.