...अन्यथा ओला कचरा उचलणे बंद
By admin | Published: July 2, 2017 06:45 AM2017-07-02T06:45:36+5:302017-07-02T06:45:36+5:30
ओला व सुका कचरा वेगळा करण्याची वारंवार ताकीद देऊनही मुंबईकर दाद देत नसल्याने महापालिका प्रशासनाने ब्रह्मास्त्र काढले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओला व सुका कचरा वेगळा करण्याची वारंवार ताकीद देऊनही मुंबईकर दाद देत नसल्याने महापालिका प्रशासनाने ब्रह्मास्त्र काढले आहे. त्यानुसार दररोज शंभर किलो व त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या संकुलांनी आपापल्या परिसरात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे पालिकेने कळवले होते. मात्र या नोटिशीकडेही कानाडोळा केल्यास २ आॅक्टोबरपासून ओला कचरा उचलणार नाही, असा इशाराच पालिकेने दिला आहे.
महापालिका मुख्यालयात शनिवारी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत आयुक्त अजय मेहता यांनी हा निर्णय जाहीर केला. २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक चटई क्षेत्र त्याचबरोबर ज्या संकुलांमधून दररोज १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट संकुलातच लावण्याचे पालिकेने सूचित केले होते.
मात्र अनेक गृहनिर्माण संकुले या नोटिशीला केराची टोपली दाखवित आहेत. त्यामुळे कठोर पावले उचलण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यानुसार २ आॅक्टोबरपासून अशा संकुलांमधील ओला कचरा न उचलण्याचे आदेश शनिवारच्या बैठकीदरम्यान महापालिकेच्या घनकचरकचरा वर्गीकरणाचा कृती आराखडा
महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर दररोज किती कचरा गोळा होतो, त्याचे वर्गीकरण व त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावता येऊ शकते, याबाबत सविस्तर कृती कार्यक्रम १ आॅगस्टपर्यंत देण्याचे आदेश सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांना शनिवारच्या बैठकीत देण्यात आले.
व्यवस्थापन खात्याला आयुक्तांनी दिले. तर विभाग स्तरावर सुक्या कचऱ्याचा लिलाव कशा प्रकारे करता येईल याबाबत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) लवकरच योजना सादर करणार आहेत.
भाजी मंडईतील कचरा व्यवस्थापन
महापालिका मंडयांमध्ये दिवसातून तीनवेळा साफसफाई केली जाते व तेथील कचरा उचलला जातो. हा कचरा ठरवून दिलेल्या ठिकाणीच टाकावा, असे आवाहन महापालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात येत आहे.
याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या भाजी मंडयांमध्ये तिथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट मंडईस्तरावरच लावण्यात येणार आहे. यासाठी सहायक आयुक्त (बाजार) यांनी ‘वेस्ट कन्व्हर्टर’ मंडयांमध्ये बसवावेत, असे आदेश बैठकीत महापालिका आयुक्तांनी दिले.