Join us

...नाहीतर मुंबईतील २००० शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:08 AM

वेगळी संचमान्यता करा : मुंबई विभागासाठी मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुबई : संचमान्यता २ वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्यस्थितीत मुंबईतील ...

वेगळी संचमान्यता करा : मुंबई विभागासाठी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुबई : संचमान्यता २ वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्यस्थितीत मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांची संख्या ५०० हून अधिक असून प्रचलित पद्धतीने संचमान्यता केल्यास मुंबईत सुमारे २००० शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. याकरिता मुंबईची संचमान्यता वेगळी करावी, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने केली असून त्याबाबतचे निवेदन शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिले. यावर धोरणात्मक निर्णयासाठी वेगळी सभा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिले.

मुंबईत अनुदानित शाळांची संख्या ११०० वरून ८७९ पर्यंत कमी झालेली असून अनुदानित शाळेच्या इमारतीत अन्य बोर्डाच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीसंख्येत घट होत आहे. मुंबईमध्ये अन्य बोर्डाच्या व सरकारी अनुदान न घेणाऱ्या शाळा आता ७७२ तसेच स्वयंअर्थसाहाय्यित ५८ अशा एकूण ८३० हून अधिक शाळा झाल्या आहेत आणि दरवर्षी त्यांची संख्या वाढत आहे. एकाच इमारतीत विशेषत: अनुदानित शाळेच्या इमारतीत अन्य बोर्डाच्या व सेल्फ फायनान्सला मंजुरी दिल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होत आहेत. यामुळे काही वर्षांतच मराठी माध्यमासह अन्य माध्यमाच्या अनुदानित शाळांची संख्या शून्यावर येईल, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. यावर शिक्षण राज्यमंत्री गंभीर असून लवकरच निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या कंत्राटीकरणाच्या विषयावरही कडू यांनी शिक्षक संघटनेला आश्वासित केले असून त्यासंबंधी शिक्षण कॅबिनेट मंत्री व अर्थ मंत्री यांच्यासोबत लवकरच वेगळी बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले आहे. याचसोबत शालार्थ आयडीची प्रलंबित प्रकरणे ८ दिवसांत निकाली काढून संबंधितांवर कारवाई करा आणि विभागीय उपसंचालक स्तरावर सदरची प्रकरणे निकाली काढा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

..................................