...अन्यथा ते निसर्ग निवास सोडून जातील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:12+5:302021-06-06T04:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नैसर्गिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांविषयी, या स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नैसर्गिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांविषयी, या स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करताना आणि त्यांची छायाचित्रे काढताना घ्यायच्या काळजीबद्दल पर्यटकांना जागरूक करणे गरजेचे आहे. कारण स्थलांतरित पक्ष्यांच्या निसर्गनिवासाला धक्का पोहचला तर त्यांच्यात भीती उत्पन्न होऊन ते कायमस्वरूपी असा निसर्गनिवास सोडून जातील, अशी शक्यता असते. याचा निसर्गावर आणि आसपासच्या लोकांच्या जीवनावर फार दूरगामी परिणाम होतो, असे पक्षितज्ज्ञ धर्मराज पाटील यांनी सांगितले.
स्थलांतरित पाहुण्यांचे निसर्गनिवास जंगले, खुरट्या झुडपांची वने, गवताळ प्रदेश, सरोवरे, समुद्रकिनारे, शेतजमिनी आणि शहरी भाग असे आहेत. राज्यातील जवळजवळ २२ टक्के भाग जंगलांचा आहे. मात्र सद्य परिस्थितीतील वनक्षेत्र याच्या निम्मेच आहे. विशेषतः अरबी समुद्र आणि पश्चिम घाटांच्या मधला भूभाग जैवविविधतेने समृद्ध आहे. महाराष्ट्र केवळ देशी-विदेशी पर्यटकांचेच खास गंतव्यस्थान आहे, असे नाही तर खडतर हवामानापासून बचाव करण्यासाठी येथे येणाऱ्या छोट्या स्नेह्यांना आसरा देतो ही बाब गौरवास्पद आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण करणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांची माहिती सर्वदूर पसरावी आणि त्यानिमित्ताने त्यांचे संरक्षण व्हावे, त्यांच्या निसर्गनिवासांच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.
* स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांमध्ये वैविध्य
भारतात स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये प्रचंड वैविध्य आढळते. यातील बरेचसे पक्षी खडतर अशा हिमालय पर्वतरांगांना पार करून भारतात पोहचतात. कडक हिवाळ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून येथे आलेल्या या पक्ष्यांना आसरा द्यायला असंख्य निसर्गनिवास भारतात आहेत. पर्यटनातून या निसर्गनिवासांचे संवर्धन होऊ शकते आणि तेथील रहिवाशांना संवर्धन कार्याद्वारे उत्पन्नाचे साधन प्राप्त होऊ शकते.
- धर्मराज पाटील, पक्षितज्ज्ञ
* येथे हाेते स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
महाराष्ट्रात भिगवण, शिवडी (मुंबई) , पाषाण तलाव (पुणे), सवना तलाव (अमरावती), औरंगाबाद, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य (नाशिक), हातनूर धरण (जळगाव) आणि कोकणाच्या विविध भागांत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते.
* हिवाळ्यात येणारे पक्षी
महाराष्ट्राच्या विविध भागात बरेचसे स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात येणारे असतात. पाणथळ प्रदेशात राहणारे पक्षी जसे की, बदक हंस कुरव (गल), कुररी (टर्न), करकोचा (क्रेन) , फ्लेमिंगो (रोहित), सँडपायपर, हॅरिअर, पावशा (कुकू) , पंकोळी (स्वॅलो) , बटबट्या (वॉरब्लर) , खाटीक (चॅट), धोबी (पिपिट किंवा वॅगटेल) देखील येथे हिवाळ्यात आवर्जून येतात.
* पावसाळ्यात येणारे पक्षी
रेन-क्वेल, पाय-क्रेस्टेड ककू, इंडियन पिट्टा अशा प्रजातींचे पक्षी मुख्यत्वेकरून पावसाळ्यात भेट देतात. मात्र रोहित पक्षी (फ्लेमिंगो) , मळगुजा (ब्लॅकटेल गॉडविट), गुलाबी मैना (रोझी स्टर्लिंग), गुलाबी छातीचा कोकीळ-खाटीक (रेड- ब्रेस्टेड फ्लायकॅचर), वृक्ष तीरचिमणी (ट्री पिपिट), पिवळा धोबी (येलो वॅगटेल) थापट्या (नॉर्दर्न शोव्हलर) , काळ्या डोक्याचा कुरव (ब्लॅक हेडेड गल) आणि छोटा टिलवा (लिटिल स्टिंट), हे पक्षी सगळ्यात जास्त प्रमाणात स्थलांतर करून महाराष्ट्रात येणारे आहेत.
* फ्लेमिंगो
फ्लेमिंगो आफ्रिका, आग्नेय आशिया, दक्षिण युरोप आणि हिमालयाच्या दक्षिणेकडून येतात. नवी मुंबईला सिवुड्स-दारावे जवळ किंवा मुंबईत शिवडीच्या खाडीजवळ, भांडूप पम्पिंग स्टेशन, ठाण्याची खाडी, तसेच कळंबा, रंकाळा आणि भिगवण अशा ठिकाणी रोहित पक्षी पाहायला मिळतात. सप्टेंबर ते एप्रिल दरम्यान त्यांना पाहायची संधी मिळते.
* गुलाबी मैना (रोझी स्टर्लिंग )
हा पक्षी हिवाळ्यात तब्बल ४००० किमीचे अंतर पार करून युरोपातून भारतात येतो. हे पक्षी भिगवण, पनवेल, बारामती, सोलापूर अशा ठिकाणी पाहायला मिळतात.
* पिवळा धोबी (येलो वॅगटेल )
पिवळा धोबी हा युरोपातून दर हिवाळ्यात महाराष्ट्रात येणारा पक्षी आहे. हे पक्षी पुण्यात, मुंबईच्या उत्तरेला आणि जळगावमध्ये पाहायला मिळतात.
* थापट्या (नॉर्दर्न शॉव्हलर )
उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया मध्ये आढळणारे हे एका जातीचे बदक आहे. हे ठाण्याची खाडी आणि डोंबिवली परिसरात थापटे पाहायला मिळतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा त्यांना पाहायचा उत्तम कालावधी आहे.
*काळ्या डोक्याचा कुरव (ब्लॅक हेडेड गल)
काळ्या डोक्याचा कुरव हा ३५-४५ सेंटिमीटर लांबीचा छोटासा पक्षी असतो. ही प्रजाती युरोप, मध्य आशिया, मध्य-पूर्व आशिया, आफ्रिका, भारतीय उपखंड, आग्नेय आशिया आणि कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावर आढळते. ठाणे आणि ऐरोलीच्या खाडीजवळ हे पक्षी पाहायला मिळतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा त्यांच्या आगमनाचा कालावधी असतो.
* छोटा टिलवा ( लिटिल स्टिंट)
आर्क्टिक युरोप आणि आशिया अशा दोन खंडात राहणारा हा पक्षी दूरच्या अंतरावर स्थलांतर करणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. शिवडीची आणि ठाण्याच्या खाडीजवळ हा पक्षी पाहायला मिळतो.
--------------------------------------------------------------------------------