Join us

माफी मागा अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, रिलायन्सची संजय निरुपम यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 4:58 AM

मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात केलेले आरोप मागे घ्यावेत अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा रिलायन्सने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दिला आहे.

मुंबई  - मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात केलेले आरोप मागे घ्यावेत अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा रिलायन्सने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दिला आहे. आरोप मागे घेण्यातबाबतची नोटीसच बुधवारी रिलायन्सने निरुपम यांना पाठविली आहे.संजय निरुपम यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रिलायन्सवर आरोप केले होते. ५,७७५ कोटींचा बाजारभाव असणारी तोट्यातील रिलायन्स इंफ्रा ही कंपनी अदानी ट्रान्समिशन कंपनीने तब्बल १८,८०० कोटींना विकत घेतली. यात संशयास्पद व्यवहार असून, याची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली होती. तोट्यातील कंपनी विकत घेण्यामागे घोटाळा असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती. निरुपम यांच्या आरोपांवर रिलायन्सने तीव्र हरकत घेतली आहे. निरुपम यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. ७२ तासांत निरुपम यांनी आपले आरोप मागे घ्यावेत आणि माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, अशी नोटीस रिलायन्सने निरुपम यांना बजावली आहे. यापूर्वी २०१४ साली निरुपम यांनी रिलायन्स कंपनीविरोधात अनेक आरोप केले होते. त्यानंतर, कंपनीने न्यायालयात धाव घेतली. यावर निराधार आणि चुकीचे आरोप करू नयेत, असे न्यायालयाने निरुपम यांना बजावले होते. निरुपम यांचे ताजे वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचाही दावा कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. 

टॅग्स :संजय निरुपमरिलायन्सबातम्या