लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): भाजपविरोधात लढणारे पक्षापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. एकत्र येऊन आणि आक्रमकपणे लढणे अपेक्षित असताना केवळ कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे यांच्यात एकी होणार नाही. त्यामुळे राज्यात ४८ जागा लढविण्याची तयारी ठेवा, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
साने गुरूजींची १२५ वी जयंती आणि सेवा दलाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘संविधान निर्धार सभे’चे आयोजन वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. राष्ट्र सेवा दल आंदोलन शतक महोत्सवी वर्ष आणि साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात संविधान निर्धार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. १९४९ मध्ये सरदार पटेल गृहमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. त्यानंतर ३ अटींवर त्याच्या प्रमुखांची सुटका केली. मात्र, संघाने स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टला साजराच केला नाही. त्यामुळे पटेल नाखूष होते. चळवळींनी धर्मवाद्यांना नेहमीच कडवा विरोध केला. मात्र, नव्या समाजाच्या प्रश्नांना पर्याय दिले नाहीत. त्या निर्माण झालेल्या दरीची जागा धार्मिक संघटनांनी घेतली. अनेक मंडळी धर्मवादाकडे झुकली. तेव्हा विरोधासाठी नवीन भूमिका घ्यावी लागेल. धर्माची कठोर पण तर्कवादाने चिकित्सा केल्याशिवाय ही लढाई जिंकणे आता शक्य नाही. ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय झाल्याची टीका आंबेडकरांनी यावेळी केली.
रा. स्व. संघावर टीका
जेव्हा संधी येईल तेव्हा संविधान बदलू ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका राहिली आहे. यानुसार ते वागत आहेत. हा वैचारिक संघर्ष जनतेपर्यंत नेण्यास आपण कमी पडलो आहे. त्यामुळे संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरोधात असे गट पडले असताना ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य यांनी प्रास्तविक केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी, आ. कपिल पाटील, काळुराम धोदडे, पन्नालाल सुराणा, दत्ता गांधी, बानी दास, अब्दुल कादर मुकादम, भारत लाटकर, अशोक बेलसरे, कृष्णा खोत आदी उपस्थित होते.