लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपविरोधात इंडिया आघाडी किंवा शिवसेनेसोबत आमची युती झाली नाही तर आम्हाला आमचा लढा एकट्याने लढावा लागेल. आम्ही मुंबईतील सर्व सहा जागा लढू, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी स्पष्ट केले.
आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील आंबेडकर भवन येथे पक्षाची मुंबईतील जागांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे मुंबई विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आपली युती आहे. मात्र, इंडिया आघाडीबाबत अद्याप त्यांचा निर्णय झाला नाही. शिवसेनेने काँग्रेस आघाडी किंवा वंचित यांच्यापैकी एकाची निवड करावी, अशी अट टाकली गेली आणि शिवसेनेने काँग्रेसचा पर्याय निवडल्यास आपला लढा एकट्याने लढावे लागेल. त्यामुळे सर्व जागांवर तयारी करा, अशा सूचना आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
निमंत्रण आले तर...
लोकसभा निवडणुकीसाठी लवकरात लवकर जागावाटप करा, असे मी वर्षभरापासून सांगत आहे. तरीही जागावाटपाची चर्चा झाली नाही. दुसरीकडे समाजवादी पक्षासोबत सध्या काँग्रेसचे जे सुरू आहे ते पाहता आम्हाला जो बोध घ्यायचा आहे तो आम्ही घेत आहोत. इंडिया आघाडीत कोणाला घ्यायचे, कोणाला नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा. आम्हाला निमंत्रण आले तर आम्ही जाऊ, असेही आंबेडकर म्हणाले.