'नाहीतर तुला अटक..,' आयकर अधिकाऱ्यांची लाचखोरी सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 06:19 AM2023-06-01T06:19:59+5:302023-06-01T06:20:13+5:30
आयकर अधिकाऱ्याच्या लाचखोरीचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
मुंबई : आम्ही सांगतो त्या कंपनीविरोधात जबाब दे, नाही तर तुला अटक करू, अटकेची कारवाई नको असेल तर आम्हाला १० लाख रुपये आता दे, असे सांगत त्यापैकी साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आयकर अधिकाऱ्याच्या लाचखोरीचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फूटेजची दखल घेत सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण काय?
वह्या-पुस्तकांच्या व्यवसायात असलेल्या दिल्लीतील एका व्यापाऱ्याच्या घरी मुकेशकुमार (आयकर अधिकारी) आणि अनूपकुमार (आयकर निरीक्षक) पोहोचले.
स्वतःच्या ऑफिसमध्ये असलेल्या व्यापाऱ्याला ही बातमी कळताच तो तातडीने घरी गेला.
या व्यापाऱ्याने ज्या अन्य एका कंपनीशी व्यवहार केला होता, त्या कंपनीविरोधात आयकर विभाग कारवाई करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले व त्या कंपनीशी केलेल्या व्यवहारांची माहिती देण्यास फर्मावले.
माहिती घेण्यासाठी मग हे दोन्ही अधिकारी व्यापाऱ्याच्या कार्यालयात पोहोचले. अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या कार्यालयातील फाइल्स, संगणक आदींची तपासणी केली. संबंधित कंपनीविरोधात जबाब नोंदविण्यासाठी त्याच्यावर दोन्ही अधिकारी व्यापाऱ्यावर दबाव आणू लागले.
कंपनीशी असलेले सर्व व्यवहार कायदेशीर असून, त्यावर करही भरल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.
अखेरीस आपल्या हाती काहीच लागत नसल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याला अटकेची धमकी दिली.
अटकेची धमकी दिल्यानंतर व्यापारी घाबरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्याच्याकडे दहा लाखांची लाच मागितली.
एवढे पैसे देणे शक्य नसल्याचे व्यापाऱ्याने सांगितले आणि तडजोड करत ही रक्कम पाच लाखांवर आली.
व्यापाऱ्याने पाच लाखांची व्यवस्था करत त्या नोटा वर्तमानपत्रात गुंडाळून त्यांच्या बॅगमध्ये टाकल्या. मात्र, हे पैसे आमच्या वरिष्ठांसाठी असून, आमच्यासाठी आता ५० हजार दे अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली. ते पैसेही व्यापाऱ्याने दिले.
पैसे मिळाल्यावर रात्री साडेअकरा वाजता दोन्ही अधिकारी त्याच्या कार्यालयातून निघून गेले.
त्यानंतर व्यापाऱ्याने सीबीआयकडे लेखी तक्रार केली
लाचखोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्याचे फुटेजही सीबीआयला दिले.
त्यानंतर सीबीआयने मुकेश व अनूपकुमार या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.