Join us

दोन कोटी राेजगार देण्याची आमची क्षमता; मुंबईपेक्षा भव्य फिल्मसिटी बनविणार -  योगी आदित्यनाथ

By अतुल कुलकर्णी | Published: January 05, 2023 9:30 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकमतला विशेष मुलाखत

मुंबई : ‘मुंबई अर्थ की नगरी है... यूपी धर्म की नगरी है’, असे सांगत हाच विकासाचा धर्म उत्तर प्रदेश जोपासत आहे. देशातले कारखाने कोविड काळात बंद झाले, तेव्हा उत्तर प्रदेशातील कारखाने सुरू होते. आमच्याकडे ९६ लाख एमएसएमई आहेत. प्रत्येकाने दोन लोकांना काम द्यायचे ठरवले, तर दोन कोटी लोकांना काम देण्याची क्षमता उत्तर प्रदेशात तयार झाली आहे, असे सांगत यूपीच्या विकासाचा रोड मॅपच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडला.

उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी योगी मुंबई दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांनी लोकमतला विशेष मुलाखत दिली. यावेळी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी योगी आदित्यनाथ यांना लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची प्रतिकृती भेट दिली. विविध प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले,  प्रत्येक पोलिस ठाण्यात अँटी रोमिओ स्कॉड तयार केले. मुलींना, महिलांना त्रास दिल्याची एक जरी तक्रार आली, तर संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. आज यूपीमध्ये महिला मुक्तपणे फिरत आहेत.

मुंबईची फिल्मसिटी वेगळी, आमची जगावेगळी..!

 मुंबईची चित्रपटसृष्टी तुम्ही उत्तर प्रदेशला नेत आहात, असा आपल्यावर आक्षेप आहे, त्याचे काय...?  असे विचारले असता मी फिल्मसिटी पळवायला नाही तर माझ्या राज्यात नवीन फिल्मसिटी बनवायला आलो आहे, असे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले, कोण छोटा, कोण मोठा हे दाखवण्यासाठी मी आलो नाही. 

 माझा तो हेतू नाही. मला माझ्या राज्यात जागतिक दर्जाची चित्रपटसृष्टी उभी करायची आहे. मुंबईची फिल्मसिटी ५०० एकरमध्ये आहे. मी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ १,२०० एकर जागेवर चित्रपटसृष्टी उभी करत आहे. 

 जगात जे उत्तम आहे ते सगळे तिथे असेल. जागतिक दर्जाच्या चित्रपट निर्मिती कंपन्या तेथे येतील. दीड ते दोन वर्षांत त्याचे कामही पूर्णत्त्वास नेले जाईल.

विकास झाला, म्हणजे नेमके काय झाले...?मुरादाबाद जिल्ह्यात आधी प्रचंड भ्रष्टाचार होता. लोकांना उद्योग करताना पोलिस, पर्यावरण विभागाचे लोक त्रास देत होते. तेथे वीज दिली. पीएनजी दिले. त्याच मुरादाबाद जिल्ह्यातून आता दरवर्षी १४ हजार कोटींचे ब्रास एक्सपोर्ट केले जाते. भदोईमधून दरवर्षी ६ हजार कोटींचे कार्पेट जगभरात पाठवले जाते. दीड लाख पोलिसांची भरती केली. ४० हजार महिला कॉन्स्टेबल्सना नोकरी दिली. पायाभूत सुविधांचे मोठे नेटवर्क उभे झाले. ते तुम्हाला तेथे येऊनच बघावे लागेल.

यूपीचे लोक पाठवा... कारखाने बंद पडले...!उत्तर प्रदेशात विकास नाही म्हणून लोक अन्य राज्यात कामासाठी जातात व त्या राज्यात अडचणी निर्माण करतात, अशी टीका होत आहे. असा थेट प्रश्न विचारला असता योगी म्हणाले, कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर लोक उत्तर प्रदेशात परत आले. त्यांची सगळी व्यवस्था आम्ही केली.  २५ कोटी लोकसंख्येचा हा प्रदेश आहे. ७५ जिल्हे आहेत. कोरोनानंतर अनेक राज्यांनी विनंती केली की, तुमच्या लोकांना आमच्या राज्यात येऊ द्या, आमचे कारखाने चालू करायचे आहेत. लोकांच्या सुरक्षेची हमी घेत असाल तर लोकांना येऊ देतो, असे सांगितल्यानंतर अनेक राज्यांनी त्याची खात्री दिली. म्हणून त्या राज्यांत विकासाची चाके फिरू लागली.

मला दिल्लीत नाही, गोरखपूरला जायचे आहे..!लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही तुम्हाला दिल्लीत पाहायचे का? असा सवाल केला असता योगी म्हणाले, माझे ठरवलेले काम संपले की मला गोरखपूरला पीठात जाण्याची इच्छा आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात येत आहे. त्याचे विश्व हिंदू परिषद, अयोध्येतील पुजारी स्वागत करत आहेत. असे का? असे विचारता योगी म्हणाले, जनभावनेचा आदर केला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून कोणालाही कुठेही जाता येते. मात्र या देशात चीन आणि पाकिस्तानची भीती दाखवत असाल, तर ते चालणार नाही. कोणी विचारायला गेल्यानंतर लोक चांगलंच बोलतील. वाईट कोण बोलेल..? असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता भाष्य केले.

१,२०,००० माइक जमा झाले..! गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही. कुठल्याही धर्माचा असो, मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारावरील भोंगे आम्ही उतरवले. सगळ्यात आधी गोरखपूर मंदिरातील माईक उतरवला. एक लाख वीस हजार माइक जमा झाले. ते वेगवेगळ्या शाळा, हॉस्पिटल्सना द्यायला लावले.  धार्मिक परिसरवगळता रस्त्यांवर आता कुठेही तुम्हाला कोणत्याही धर्माचे भोंगे ऐकू येत नाहीत. मात्र, काही जणांना या गोष्टी जाणीवपूर्वक बघायच्या नाहीत.

टॅग्स :योगी आदित्यनाथ