मुंबईकरांचा जीव वाचविणे हाच आमचा उद्देश - अश्विनी जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:05 AM2019-07-24T03:05:45+5:302019-07-24T03:06:01+5:30

संकट काळात लाख मोलाचे जीव वाचविण्यासाठी धडपडणाºया या यंत्रणेवर मात्र अनेक वेळा टीकेची झोड उठत आहे. प्रत्यक्षात दिवसरात्र ही यंत्रणा कशी झटत असते,

Our aim is to save the lives of Mumbaiis - Ashwini Joshi | मुंबईकरांचा जीव वाचविणे हाच आमचा उद्देश - अश्विनी जोशी

मुंबईकरांचा जीव वाचविणे हाच आमचा उद्देश - अश्विनी जोशी

Next

आपत्कालीन परिस्थिती कधी, कुठे आणि केव्हा निर्माण होईल, याचा अंदाज बांधणे अशक्य आहे. अचानक उद्भवलेल्या आपत्तींवर मात करण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. मुंबईत दररोज कुठे ना कुठे छोट्या-मोठ्या दुर्घटना घडत असतात. अशा वेळी सर्व यंत्रणांना सतर्क करणे, घटनास्थळी आवश्यक मदत पोहोचविणे, तसेच समन्वयाची जबाबदारी ‘आपत्कालीन नियंत्रण कक्षा’वर असते. संकट काळात लाख मोलाचे जीव वाचविण्यासाठी धडपडणाºया या यंत्रणेवर मात्र अनेक वेळा टीकेची झोड उठत आहे. प्रत्यक्षात दिवसरात्र ही यंत्रणा कशी झटत असते, याबाबत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी शेफाली परब-पंडित यांनी साधलेला संवाद...

आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य कसे पोहोचविता?
आपत्कालीन नियंत्रण कक्षात सर्व सरकारी यंत्रणांशी जोडणाऱ्या ५२ हॉटलाइन आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या खास मुंबईसाठी राखून ठेवल्या आहेत. त्यांची सर्व व्यवस्था अंधेरी येथील क्रीडा संकुलात करण्यात आली आहे. इमारत कोसळण्यासारख्या दुर्घटनांमध्ये एनडीआरएफ पथकाला तत्काळ बोलाविण्यात येते. आपत्ती मोठी असल्यास (लेव्हल तीन) अग्निशमन दलाचे प्रमुख, पालिका अधिकारी घटनास्थळी पोहोचतात. रुग्णवाहिका, आगीचे बंब पाठविण्यात येतात. आसपासच्या रुग्णालयाशी समन्वय साधून जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था केली जाते. बचाव कार्यात जास्तीतजास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यास प्राधान्य देण्यात येते.

मालाड दुर्घटनेवेळी मदतकार्य उशिरा पोहोचल्याचा आरोप होतोय. यात तथ्य आहे काय?
ही दुर्घटना घडली, त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्याच रात्री विमानतळावर एमर्जन्सी होती. तिथे सहा मोठे आगीचे बंब, विभागीय अग्निशमन अधिकारी, ५० मनुष्यबळ मदतीसाठी पाठविण्यात आले होते. क्रांतिनगरमध्ये मिठी नदीचे पाणी शिरू नये, तसेच जीवितहानी टाळण्यासाठी स्थानिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कार्य सुरू होते. त्या एका दिवसात साडेतीन हजार तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. मालाड दुर्घटनेच्या ठिकाणीही मदत तत्काळ पोहोचविली होती. जखमींकडून उपचारासाठी कोणतेही पैसे न घेण्याचे रुग्णालयांमध्ये कळविण्यात आले होते. त्या परिस्थितीत जे जे शक्य होते, ते सर्व करण्यात आले. दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतुकीचा अडथळा, काही वेळा अरुंद गल्ल्या, चिंचोळ्या मार्गातून वाट काढावी लागते. टीका होतच राहते, आपण आपले कार्य करीत राहावे.

डोंगरी इमारत दुर्घटनेत मदतकार्यात कोणत्या अडचणी आल्या?
डोंगरीमध्ये इमारत कोसळल्याची बातमी नियंत्रण कक्षात पोहोचली, तेव्हा कार्यालयीन वेळ असल्याने संपूर्ण यंत्रणा तैनात होती. इमारत दुर्घटनेत मदतकार्यासाठी एनडीआरएफ पथकाला तत्काळ सूचित करण्यात आले. पथकाला घटनास्थळी पोहोचण्यास किमान तीन तास लागतात. हे पथक पोहोचेपर्यंत अग्निशमन दलाच्या ताफ्याने त्या ठिकाणी मदतकार्य सुरू केले होते. मात्र, तिथल्या अरुंद गल्ल्या आणि चिंचोळ्या मार्गांमुळे मदतकार्यात अनेक अडचणी येत होत्या. इमारतीच्या ढिगाºयाखाली माणसे दबली असण्याची शक्यता असते, त्यामुळे यंत्रे, गॅस कटर वापरणे धोकादायक ठरू शकते. यासाठी मानवी पद्धतीने ढिगारा उपसावा लागतो. डोंगरी परिसरात गल्लीतून डेब्रिज बाहेर काढणेही अवघड झाले होते. अशा वेळी स्थानिक रहिवाशांनी मानवी साखळी करीत मदतकार्यात सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे आभारच मानावे लागतील.

पावसाचे पाणी तुंबण्याची ठिकाणे वाढतच का आहेत?
पावसाचे पाणी उपसण्यासाठी मुंबईत १,४०० पंप लावण्यात आले आहेत. यंदा पहिल्यांदाच कांजूरमार्ग रेल्वे ट्रकवर पाणी आले होते. नजीकच्याच मिठागराच्या ठिकाणी असलेला नाला बुजविण्यात आल्याने हे पाणी तुंबल्याचे नंतर कळले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाणी तुंबणाºया मुंबईतील ५२ स्थळांवर पालिका बारीक लक्ष ठेवून आहे. गझदरबंद आणि ब्रिटानिया पंपिंग स्टेशनमुळे स्थानिक परिसरांना दिलासा मिळाला आहे. हिंदमाताचा प्रश्नही लवकरच सुटेल. यासाठी ५२ वृक्ष तोडून पर्जन्य वाहिन्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. हळूहळू त्यांना यश येत आहे. लोकांमध्ये जागृती वाढली आहे. समस्या सुटत असल्याचा त्यांनाही विश्वास वाटत आहे.
 

कचºयाबाबत काय उपाययोजना केली?
नाल्यात तरंगणाºया वस्तू जास्त दिसून येतात. या वस्तू अडकण्यासाठी नाल्यावर ट्रॅश ब्रुम लावण्यात आले होते. मात्र, पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा नको, म्हणून तेदेखील काढण्यात आले. नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जनजागृती, दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मासेविक्रेत्यांचा विरोध मावळण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पालिकेची मंडई अतिधोकादायक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीचे काम होईपर्यंत येथील मासेविक्रेत्यांना ऐरोलीला स्थलांतरित करण्यात येणार आहे. या ठिकाणी १७२ किरकोळ विक्रेते, तसेत अडीचशे ते तिनशे घाऊक विक्रेते आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू असून, कुलाबा येथील जागेचाही पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आला आहे. किरकोळ विक्रेत्यांना तेथे पाठविता येऊ शकते. यापैकी बहुसंख्य मासेविक्रेत्या महिला उपनगरातून येथे येतात. त्या राहत असलेल्या ठिकाणी पालिकेच्या जवळच्या मंडईत जागा देता येईल.

Web Title: Our aim is to save the lives of Mumbaiis - Ashwini Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.