आमचे कपडे, आमचा अधिकार ! कपड्यांबाबत तरुणींच्या सडेतोड प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:57 AM2019-05-07T02:57:54+5:302019-05-07T02:58:21+5:30
गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला. एका महिलेने काही मुलींना त्यांनी घातलेल्या तोकड्या कपड्यांवरून खडसावत, असे वागता मग, तुमच्यावर बलात्कार होईल, अशा प्रकारचे वक्तव्य केले. त्यानंतर त्या स्त्रीविरोधात अनेक आक्रमक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.
गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला. एका महिलेने काही मुलींना त्यांनी घातलेल्या तोकड्या कपड्यांवरून खडसावत, असे वागता मग, तुमच्यावर बलात्कार होईल, अशा प्रकारचे वक्तव्य केले. त्यानंतर त्या स्त्रीविरोधात अनेक आक्रमक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. त्यांना खूप ट्रोलही केले गेले. मुलींनी नेमके कोणते कपडे घालायचे यावर पुन्हा समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. आता जग बदललंय, साडीच्या जागी पंजाबी ड्रेस तेही ओढणीशिवाय घालण्याचा ट्रेंड आहे. इतकं च नाहीतर, आता कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये किंवा अगदी रोजच्या वापरातही मुली जीन्स, टीशर्ट, शॉर्ट ड्रेस घालून वावरतात. त्यात अयोग्य काहीच नाही. मुलं ज्याप्रमाणे एखाद्या लोकप्रिय कलाकाराला फॉलो करत बनियन आणि शॉर्ट्स घालून सर्रास डिस्कोथेकमध्ये मजा करतात त्याप्रमाणे मुलींनी जर शॉर्ट कपडे घातले तर त्यात बिघडले कु ठे? शेवटी प्रत्येकाला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल असे कपडे निवडण्याचा, ते घालण्याचा अधिकार आहे. मग यात मुलीही मागे नाहीत.
एक काळ होता की आई-वडील जे सांगतात तेच कपडे मुले घालत. पण हे तिसरी ते चौथीपर्यंत ठीक आहे. आजकाल मुलं-मुली वयात येऊ लागली की ती कपड्यांच्या बाबतीत त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात. पालकही त्यांच्या या निर्णयाला प्रोत्साहन देतात. त्यामुळे मुलींनी शॉर्ट कपडे घालणं यात गैर काहीच नाही. मुद्दा आहे तो दृष्टिकोन बदलण्याचा. तो बदलायला एक स्त्रीच पुढाकार घेऊ शकते. कारण महिलांचा दृष्टिकोन बदलला तर ती आपल्या मुलांना स्त्रियांकडे कसं बघावं याविषयी योग्य दिशा दाखवू शकते, अशी प्रतिक्रिया अनेक जणी व्यक्त करीत आहेत. त्या स्त्रीच्या वक्तव्यावर काही मुलींनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया...
मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. एकीकडे आपण म्हणतो की मुलींना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्यावर बंधने नाही घातली पाहिजेत; तर मग एखादी मुलगी जर शॉर्ट ड्रेसेस घालत असेल तर त्यासाठी तिच्यावर बंधने कशाला हवीत? आज जर एक बाईच लहान कपडे घातलेल्या मुलींकडे बोट दाखवत असेल तर तिचा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा आहे. प्रत्येक मुलाने किंवा व्यक्तीने मुलींना आदरानेच वागवले पाहिजे
- साक्षी महाडिक, वझे केळकर महाविद्यालय
गेल्या काही वर्षांत मुलींना लहान कपडे घालण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्यावर बंधनं नाहीत हे थोड्या प्रमाणात योग्य वाटते. पण त्या बाईने जे म्हटले ते चुकीचेच आहे. त्या महिलेला असे कोणालाही उद्देशून बोलण्याचा हक्क किंवा अधिकार नाहीये. आपल्या देशात त्या महिलेसारखा विचार करणाऱ्या बºयाच महिला आहेत. पण त्यांनी त्यांचे असे विचार मांडल्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढते आहे.
- समृद्धी केसकर, एम.एच. महाविद्यालय
बदलत्या काळानुसार राहणे आजच्या पिढीला योग्य वाटते. मग ती टेक्नॉलॉजी असो, राहणीमान असो किंवा फॅशन असो.. युवा पिढी कुठेच मागे नाही. पण हे प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्याने त्याने कसे राहायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर इतरांनी कमेंट करणे चुकीचेच आहे असे मी मानते. घातलेल्या कपड्यांमुळे बलात्कार होत नाहीत तर असलेल्या वाईट वृत्तीमुळे होतात, हे लक्षात घ्यावे.
- रोहिणी थोरात, नोकरी
कोणत्याही व्यक्तीस दुसºया व्यक्तीच्या राहणीमानावर, परिधान केलेल्या कपड्यांवर टिपणी देण्याचा आधिकार नाही. आपल्या समाजामध्ये पालकांनी संस्कार हे फक्त मुलींवर करता कामा नयेत तर मुलांवरदेखील चांगले संस्कार करून त्यांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; तसेच मुलींनी जेव्हा असे शॉर्ट कपडे घातलेले असतील तेव्हा त्यांना स्वत:चे रक्षण करता आले पाहिजे.
- जान्हवी फणसेकर, रहेजा महाविद्यालय
त्या महिलेची मानसिकता ही विद्रूप आहे. जी मुलींच्या तोकड्या कपड्यांवर येऊन थांबते. आम्ही काय घालायचं काय नाही हे ठरविण्याचा निर्णय हा सर्वस्वी आमचा आहे. बलात्काराची बाब ही अत्यंत भीषण आहेच; पण मुलींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे कितपत योग्य याची दखल घेतली पाहिजे. तोकडे कपडे घालण्यावर बोट ठेवण्यापेक्षा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आमच्या कपड्यांवर आमचा अधिकार आहे.
- पूजा मुधाने,
अग्रवाल महाविद्यालय
सध्याची परिस्थिती पाहता स्त्रीच स्त्रिला बंधनात अडकवत आहे. मुलींनी असे कपडे घालू नयेत तसे कपडे घालू नयेत अशी बंधने आणणे चुकीचे आहे. मुलीला आपण कोणते कपडे घालावेत हे ठरविण्याचा अधिकार आहे. पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलण्याची गरज आहे. हे जे तालिबानी विचार आहेत ते हाणून पाडण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून बघण्यापेक्षा माणूस म्हणून पाहिले पाहिजे. लहान मुलीवरदेखील शारीरिक अत्याचार होत असतात. त्यामुळे तोकड्या कपड्यांमुळे अत्याचार होतात असे समजणे चुकीचे आहे.
- वैष्णवी ताह्मणकर, कीर्ती महाविद्यालय
मुलींच्या तोकड्या कपड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रथम महिलांनी बदलायला हवा. आपण पुरोगामी महाराष्ट्रात वावरत असताना असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. आपण केवळ पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे बोलतो. पण, महिलांची मानसिकता बदलली तर पुरुषांची मानसिकता बदलेल. मुलींना काय कुठे घालावे हे समजते. त्यामुळे त्यांना त्यांचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्या महिलेने मुलींच्या बाबतीत जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो.
- मंजिरी धुरी (विद्यार्थी भारती संघटना, राज्य अध्यक्षा)
महिलेने केलेले वक्तव्य चुकीचे आहे. मुलांना तुम्ही काय घालावे आणि काय नाही हे सांगता का? मग मुलीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न का करता? एखाद्या महिलेने महिलांच्या बाबतीत असे वक्तव्य करणाºया मनोवृत्तीचा निषेध केला पाहिजे. त्यापेक्षा आपल्या मुलांना म्हणजेच पुरुषांच्या मनातील विकृती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा. मुलांना तसे संस्कार द्या. पण तसे करताना कुणी दिसत नाही.
- गौरी भिडे, मुंबई युनिव्हर्सिटी
संकलन - प्रज्ञा म्हात्रे,जान्हवी मोर्ये