आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवेच, वचनपूर्ती सोहळ्यात उद्धव ठाकरेंचे वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:44 AM2020-01-24T06:44:10+5:302020-01-24T06:44:33+5:30
आमचा रंग भगवाच आहे आणि अंतरंगही भगवेच आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बीकेसी मैदानावर आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात दिली.
मुंबई : चाळीस वर्षे आम्ही ज्यांच्या विरोधात राजकारण केले त्यांच्यासोबत उघडपणे गेलो असलो तरी आमचा रंग भगवाच आहे आणि अंतरंगही भगवेच आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बीकेसी मैदानावर आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात दिली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्यापासून शिवसेनेने हिंदुत्वाला मुरड घातली असल्याच्या टीकेला उद्धव यांनी आपल्या भाषणात सडेतोड उत्तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान करीन’ असे वचन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना दिले होते. ते वचन पूर्ण केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा सोहळा होता. यानिमित्ताने शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शन केले. या वेळी दिग्गज कलावंतांनी दिमाखदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत शिवसैनिकांची मने जिंकली.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेल्या अकरा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते आणि हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा या वेळी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच मुंबईतील शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांनीही ठाकरे यांचा सत्कार केला.
उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, अशी केली. जो विश्वास आणि प्रेम मला शिवसैनिकांनी दिले त्याचा आम्ही कधीही विश्वासघात करणार नाही. या जन्मात आणि जन्मोजन्मी तुमचे ऋणी राहू, अशी ग्वाही त्यांनी शिवसैनिकांना दिली.
सत्काराला उत्तर देताना त्यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत भाजपने शब्द दिला होता तो पाळला नाही. दिलेला शब्द खाली पडला आणि मला खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. मी लढणारा आहे. प्राण गेले तरी बेहत्तर, पण खोटे बोलणार नाही. मी आणि माझे कुटुंंब शिवसैनिकांशी कधीही प्रतारणा करणार नाही, पण हिंदुत्ववादी शिवसेनेचा हात २०१४मध्ये सोडून जाणाऱ्यांनी तेव्हा सरकार स्थापन करताना अदृश्य हातांची मदत घेतली होती, आज तेच आमच्यावर खरा चेहरा उघडा पडल्याची टीका करीत आहेत. तुम्ही तर असे वागलात की अख्खे उघडे पडलात, या शब्दात ठाकरे यांनी भाजपला सुनावले.
मी स्वत: मुख्यमंत्री होईल, असे वचन बाळासाहेबांना कधीही दिलेले नव्हते. पण एका परिस्थितीत मला ते स्वीकारावे लागले. ते स्वीकारत असताना हजारो शिवसैनिकांचे बलिदान, त्याग आणि समर्पण यामुळे मी इथपर्यंत आलो याची मला जाणीव आहे. भगवा कधीही खाली ठेवलेला नाही, ठेवणार नाही. मी मुख्यमंत्री झालो ही वचनपूर्ती नाही, तर त्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, असे सांगत उद्धव यांनी भविष्यात शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच, असा विश्वास एक प्रकारे व्यक्त केला.
माझे मुख्यमंत्रिपद मी शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले, घाम गाळलेले आणि प्रसंगी रक्त सांडलेल्या शिवसैनिकांच्या चरणी समर्पित करीत आहे. हजारो शिवसैनिक हेच बाळासाहेबांचे सुरक्षाकवच होते आणि माझेदेखील आहेत. घरचे व बाहेरचे कोणीही विरोधक तलवार, चाकू, सुºया काहीही घेऊन घात करण्यासाठी आले तर हेच सुरक्षाकवच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असेल, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
आघाडीतील नेत्यांचा उल्लेख टाळला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात शिवसैनिकांचे आभार मानले. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस अथवा राष्टÑवादी काँग्रेसमधील एकाही नेत्याचा नामोल्लेख केला नाही. भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
वचनपूर्ती सोहळ्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तिकडे मनसेच्या अधिवेशनातही प्रचंड गर्दी होती. दोन्ही पक्षांनी गर्दीला गर्दीने
उत्तर दिले.