Join us

आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 1:12 PM

विरोधकांना टीका करावीच लागणार. इतके दाबूनही उद्धव ठाकरे शांत बसत नाहीत असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई - आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलंय, लोकांमध्ये आणि लोकांसोबत राहणे. वरळी विधानसभेत दिवाळी पहाट सुरू आहे. काही ठिकाणी पैशांचा पाऊस पडतोय. विचार काहीच नाही. जांबोरी मैदान रडतंय, लोकं वैतागली आहेत. आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते. भाजपाची दिवाळी पहाट पहिल्यांदा होतेय. हा विचार, संस्कार आहे. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी पहाट आहे असा खोचक टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला लगावला. 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मोठमोठे अभिनेते आणून लोकांवर छाप पाडायची नसते. लोकांमधील कलागुणांना वाव देणारी आमची पहाट असते. प्रत्येक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. काही ठिकाणी केविळवाणा प्रयत्न सुरू आहे. लोक विचारांसोबत आहेत. वारेमाप पैसा खर्च करून पाहिजे तसा कार्यक्रम घेऊ शकतात. या देशात, मुंबईत नवीन नवीन पायंडे पाडले जात आहेत त्याला आपण सगळे बळी पडतोय असंही त्यांनी सांगितले. 

तसेच विरोधकांना टीका करावीच लागणार. इतके दाबूनही उद्धव ठाकरे शांत बसत नाहीत. त्यांच्यावर तोंडसुख घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळू शकत नाही. त्यामुळे सगळे ओके आहे. आम्ही सरकारमध्ये असताना टाहो फोडायची गरज काय होती? सवयीप्रमाणे भूमिका बदलणे म्हणजे भाजपा. आनंदाचा शिधा न मिळाल्याने शिमगा झाला. खऱ्या गोष्टींकडे लक्ष न देणे, केवळ हिंदू सण नाही सगळ्यांचे सण साजरे होणार आहे. निव्वळ मुंबई डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे आणि महापालिकेला लक्ष्य केले जात आहे हे लोकांना दिसतंय असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

भाजपाकडून दिवाळी पहाटभाजपाकडून वरळीतील जांबोरी मैदान येथे मराठमोळा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर यादरम्यान, संध्याकाळी साडे सहानंतर आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये संगीत आणि खाद्यसंस्कृतीचा सोहळा साजरा करण्यात आला. खास मराठमोळी वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली. या वेशभूषा स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्यांना कार इलेक्ट्रिक दुचाकी, दुचाकी अशी बक्षीसं देण्यात आली. 

टॅग्स :किशोरी पेडणेकरभाजपाउद्धव ठाकरे