मुंबई/पुणे - आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी विविध कार्यक्रम आणि सभांच्या माध्यमांतून भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. या सभांमधून सत्ताधारी विरोधकांवर तर, विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसून येतात. त्यातच, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसीय धाराशिव दौरा केला, त्यात उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी-शाह आणि राज्यातील शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी प्रत्यक्ष उत्तर दिलं नाही. मात्र, एका कार्यक्रमातून अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उदघाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी, हाती टाळ, चिपळ्या, विना, डोक्यावर तुकोबांची पगडी परिधान करुन देवेंद्र फडणवीसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर संत तुकारामांच्या ओवीतून निशाणा साधला.
गाढवाच्या अंगी चंदनाची उटी राखे सवी भेटी गेली तडे, हा तुकाराम महाराज यांचा प्रचलित अभंग आहे. याचाच अर्थ गाढवाला कितीही चंदन उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊन राख अंगाला लावून घेणारच आहे. सध्याच्या राजकारणात अनेक लोक विविध नाटक करत आहेत. पण नागरिक सुज्ञ असून लवकरच कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याच्या वेदना होणार आहेत हेही लक्षात ठेवावे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही, हे मला राजकारणातील काही लोकांना सूचवायचं आहे. जर, ते लोकं तसे वागले तर, कट्यार काळजात घुसणार आहे. त्याच्या वेदना त्यांना होणारच आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, आमच्या एकनाथराव शिंदेंनी डंपर पलटी केलेलाच आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले.
पुणे-पिंपरी चिंचवड अर्थव्यवस्थेचे इंजिन
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत. शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. असे होत असतांना शहर बकाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनाही राबविण्यात येत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार सुविधा निर्माण कराव्या लागतील. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल
मनसे एकत्र येण्यावर फडणवीस म्हणतात
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतली आहे ती आमच्या विचारांशी विसंगत नाही. क्षेत्रीय अस्मिता ही आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांबद्दल बोलणे हे योग्यच आहे. मराठी माणसांच्या हक्कासोबत त्यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्यामुळे मनसे-भाजपा यांच्यात फारसं अंतर राहिलेले नाही. बाकी निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही. जे काही आहे चर्चेवर होईल. योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात असं त्यांनी म्हटलं आहे.