विद्यापीठाच्या कारभारावर आमची नजर असेल, असे सांगतच युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नव्या कुलगुरूंचे अभिनंदन केले आहे. कामासाठी युवासेना त्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन ही दिले आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला. त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसू लागल्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देशमुख यांना कुलगुरू पदावरून हटवित, नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती केली आहे. आता विद्यापीठाच्या प्र.कुलगुरु-परीक्षा नियंत्रक, कुलसचिव पदीही नव्याने नियुक्ती करावी, अशी मागणी करत, उपकेंद्रामध्ये सुरू असलेला गोंधळही आवरावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
विधि शाखेच्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावानव्य कुलगुरूंचे अभिनंदन. आता त्यांनी विद्यापीठाच्या विधि विभागाकडे लक्ष द्यावे. विधि शाखेच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी अपेक्षा नवीन कुलगुरूंकडून आहे. मागील दोन वेळा कुलगुरू बदलले. मात्र, परिस्थिती बदलली नाही, अशी खंत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केली.
निकाल वेळेवर लावाकुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर कशा होतील आणि त्यांचे निकाल वेळेवर कसे लागतील, याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केली.