Join us

'आमची श्रद्धा अयोध्येतील रामाशी अन् शेतकऱ्यांच्या घामाशी', CM शिंदेंची बांधावर पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 6:54 PM

अयोध्येत बाबरीचा ढाचा पाडली तेव्हा कदापी शिवसैनिक नव्हते, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांची पाहणी केली. आज अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी, धाराशिव जिल्ह्यात पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. तसेच, ज्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्त्व सोडलं, त्यांना बोलायचा नैतिक अधिकार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी, त्यांनी मी इथे शेतकऱ्यांसाठी आलोय, असे म्हणत त्यांनी पाहणी केली. 

अयोध्येत बाबरीचा ढाचा पाडली तेव्हा कदापी शिवसैनिक नव्हते, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मी स्वत: चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर बोललो. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. माजी मुख्यमंत्री आणि संजय राऊत हे शिवसैनिक नव्हते, असं त्यांना म्हणायचं होतं. बाळासाहेबांनी बाबरीचा ढाचा पडल्यानंतर जबाबदारी स्वीकारली होती, ते माझे शिवसैनिक असतील तर मला अभिमान आहे, असेही म्हटले होते, हे जगजाहीर आहे. त्यामुळे, ज्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्त्व सोडले, त्यांना हे बोलायचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे व संजय राऊतांना टोलाही लगावला. संजय राऊतांना काय महत्त्व देताय, असे म्हणत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचेही सांगितले. दरम्यान, मी आज शेतकऱ्यांच्या बांधावर आलोय, त्यांचं दु:ख-वेदना जाणून घ्यायला आलोय. आमची श्रद्धा अयोध्येतील रामाशी आणि शेतकऱ्यांच्या घामाशी आहे, म्हणूनच अयोध्येतून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आपण आलोय, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.   

प्रशासलनाला मदतीचे निर्देश

एकनाथ शिंदे यांनी आज #धाराशिव जिल्ह्यातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मौजे मोर्डा, धारूर, वाडी बामणी या  नुकसानग्रस्त झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांची विचारपूस करून, संवाद साधून त्यांना दिलासा दिला. यावेळी, शिंदे यांनी शासकीय यंत्रणेला युद्ध पातळीवर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले व मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले. हे फक्त घोषणा करणारे सरकार नसून अमंलबजावणी करणारे सरकार आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरकार आहे याचा उल्लेख केला. व सरकार तुमच्यासोबत असून लवकरात लवकर तुम्हाला मदत केली जाईल असे आश्वासनही दिले. 

दरम्यान, या अवकाळी पावसाने पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ उभारणी‌ करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाचंद्रकांत पाटीलबाळासाहेब ठाकरे