मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावर, आमचे खत चांगले आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टोलेबाजी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी अंधेरी मरोळ येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य यांनी हे वक्तव्य केले.
आदित्य ठाकरे यांच्यासह अकराशे नागरिकांनी एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही ठाकरे म्हणाले. निवडणुकीपुर्वीच्या सर्वेक्षणाबाबत आदित्य म्हणाले की, माझा त्यावर विश्वास नाही. आम्ही काम करतो. तसेच जनतेचे आम्ही आशीर्वाद घेत फिरतो. जेव्हा सत्ता असते तेव्हा लोकांची कामे करणे गरजेच असते. त्यामुळे निवडणूका येतील तेव्हा निवडणुकीवर बोलू.