मुंबई- :मुंबई शिक्षक मतदार संघात प्रथमच शिक्षक आणि शिक्षण विरोधी उमेदवार उतरले आहेत. त्यांना हरवून शिक्षक भारतीचे सुभाष मोरे विजयी होतील असा विश्वास आज समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिक्षकांचे पगार मुंबई बँकेत पळवणारे आणि शिक्षक सेवक आणून कंत्राटीकरण सुरू करणारे उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा दणदणीत पराभव करून मुंबईचे शिक्षक आपली परंपरा कायम राखातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दि,२६ जून रोजी होणाऱ्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, संघटनेचे कार्याध्यक्ष आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुभाष मोरे, मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे, माजी कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माझी लढाई कंत्राटीकरणाच्या विरोधात - सुभाष मोरे
यावेळी बोलताना उमेदवार सुभाष मोरे यांनी सांगितले की, शिक्षण हक्क आणि शिक्षक सन्मानासाठी माझी उमेदवारी आहे. कपिल पाटील यांच्या समाजवादी विचारांचा वारसा सोबत घेऊन कंत्राटीकरणाच्या विरोधात मी लढणार आहे.
दुसरीकडे तीन टर्म प्रतिनिधीत्व केल्यानंतर कपिल पाटील यांनी शिक्षक मतदार संघातून निवृत्ती घेतली आहे. सक्रीय राजकारणात ते राहतील पण वयाच्या 58 वर्षी शिक्षक निवृत्त होतात मग त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्याने निवृत्त का होऊ नये ? याच भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांची ही कृती खुर्चीला चिटकून बसणाऱ्या सर्व राजकारण्यांसाठी दिशादर्शक आहे, असे मत सुभाष मोरे यांनी व्यक्त केले.
बँकेचे उमेदवार रिंगणात
मुंबई बँकेचे संचालक आणि शिक्षक चळवळीशी संबंध नसलेले सहकार चळवळीतले एक नेते यावेळी शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढत आहेत. शिक्षक भारतीच्या प्रयत्नाने मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून होतात. मध्यंतरी हे पगार मुंबई बँकेत नेण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांनी त्याला विरोध केला. बेलसरे आणि मोरे यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष करत शिक्षकांचे पगार सुरक्षित केले. मुंबईतले शिक्षक पगाराबद्दल संवेदनशील आहेत. ते अशा शिक्षक विरोधी उमेदवाराला नाकारतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
शिक्षकांचा अवमान करणारे अधिकारी लॉबीचे उमेदवार मैदानात
शिक्षण सेवक कायदा आणून शिक्षकांचा अवमान करणारे, तुटपुंज्या मानधनावर कंत्राटीपद्धतीने काम करायला लावणारे उमेदवारही यावेळी मैदानात आहेत. सेवानिवृत्त होऊन २० वर्षांनंतर, राज्यमंत्री दर्जाचे पद भूषविल्यानंतर आता उतार वयात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनाही मुंबईतले सुज्ञ मतदार नाकारतील याची खात्री कपिल पाटील यांनी दिली.