मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता १६ हजार रुपये मिळणार आहेत. तर शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार देण्यात येमार आहे, यासाठी १५०० कोटींना मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीने निर्णय घेतले मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याच काम युती सरकारने केलं. सततच्या पावसामुळे होणार नुकसानासाठी १५०० कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कंत्राटी कामगार आणि शिक्षवृत्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. NDRFच्या नियमाप्रमाणे मदत केली जात होती. आता नव्या पद्धतीने मदत होईल, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. आमचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. केंद्र सरकारकडून देखील महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना निधी दिला जातो. आर्थिक पाठबळ दिलं जातं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचं देखील कौतुक केलं.
महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प बंद होते. ते आमच्या सरकारमध्ये पुन्हा सुरु करण्यात आले. अतिशय वेगवान प्रकल्प आणि कामे सुरु आहेत, म्हणुन राज्यातील जनतेने प्रेम दिलं. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही दोघे या राज्याचे प्रमुख म्हणून नेतृत्व करत आहोत. या राज्याला पुढे घेऊन जात आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आम्ही प्रत्यक्ष फील्डवर उतरुन काम करत आहोत, घरात बसून काम करत नाही, असा अप्रत्यक्ष टोला देखील एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, राज्यातल्या जनतेने सर्व्हेच्या माध्यमातुन आम्हा दोघांना पसंती दिली आहे. मलाही काहीतरी टक्के दिले आणि उपमुख्यमंत्री यांनाही पसंती दिली. फोटो असो किंवा नसो आम्ही दोघे ही लोकांच्या मनात आहोत हे महत्वाचं आहे. आमचं सरकार अतूट आहे. पुढील सगळे निवडणूका आम्ही एकत्र लढू, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.